गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सुपरहिरोंवर आधारित चित्रपटांचे प्रमाण वाढले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. सध्या मार्व्हल सिनेमॅटिक यूनिव्हर्स म्हणजे एमसीयूचे (MCU) चित्रपट आघाडीवर आहेत. एमसीयूचे ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ (Avengers Infinity War) आणि ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ (Avengers Endgame) या चित्रपटांनी कलेक्शनचे अनेक विक्रम मोडले होते. याच यूनिव्हर्समधला आणखी एक लोकप्रिय सुपरहिरो म्हणजे ‘डेडपूल’ (Deadpool). मार्व्हलच्या डेडपूल या सुपरहिरोची भूमिका अभिनेता रायन रेनॉल्ड्स साकारत आहे.
डेडपूल या सुपरहिरोचे चाहते जगभरात पसरले आहेत. या काल्पनिक सुपरहिरोवर आतापर्यंत दोन चित्रपट तयार करण्यात आले आहेत. अर्वाच्च भाषा, आक्षेपार्ह आणि इंटिमेट दृश्ये अशा काही मुद्द्यामुळे डेडपूल फ्रेंन्चायझी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे फ्रेंन्चायझीमधील तिसरा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली. ‘डेडपूल ३’ च्या माध्यमातून डेडपूल अधिकृतरित्या एमसीयूमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान खुद्द रायन रेनॉल्ड्सने डेडपूलच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रायनने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो घरातल्या सोफ्यावर बसलेला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘D23 ला येणं शक्य न झाल्याचे मला दु:ख आहे. आम्ही डेडपूलच्या आगामी चित्रपटावर खूप मेहनत घेत आहोत’ असे म्हणत डेडपूलप्रमाणे वायफळ बडबड करायला लागतो. बोलताना तो मुद्दामून गंभीर विषयावर काही ओळी बोलतो. त्यानंतर पुढच्या मिनिटाला त्याच्यामागून अभिनेता ह्यू जॅकमन जाताना दिसतो. तेव्हा रायन त्याला “तुला पुन्हा वुल्व्हरिन (Wolverine) व्हायला आवडेल का?” असा प्रश्न विचारतो. त्यावर ह्यू त्याला “होय रायन” असे उत्तर देतो.
या व्हिडीओद्वारे त्यांनी ‘डेडपूल ३’ मध्ये ह्यू जॅकमन वुल्व्हरिनची भूमिका साकारणार असल्याची घोषणा केली आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोगन’ (Logan) या चित्रपटामध्ये वुल्व्हरिनच्या मृत्यूनंतर ह्यू जॅकमनने हे पात्र तो पुन्हा कधीही साकारणार नसल्याचे सांगितले होते. या व्हिडीओमुळे त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.