कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा १३ मार्च रोजी करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला. परंतु या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी एस.एस.राजामौली यांना मोठी रक्कम मोजावी लागली.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली आणि त्यांचे कुटुंबीय, याशिवाय ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रा बोस, संगीतकार एम. एम. कीरावानी, साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, त्याची पत्नी आणि राम चरण त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. पण या सर्वांना ऑस्कर एंट्री मोफत नव्हती. ऑस्कर २०२३ मध्ये प्रत्येक सीट मिळवण्यासाठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजामौली यांना लाखो रुपये मोजावे लागले आहेत.
आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत
अकादमी पुरस्कारांनुसार, केवळ पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना कार्यक्रमाची मोफत तिकिटे मिळतात. तर नाटू नाटूला पुरस्कार दिला जाणार असल्याने ऑस्कर कार्यक्रमात केवळ चंद्रा बोस, एम.एम कीरावानी आणि त्यांच्या पत्नींनाच मोफत प्रवेश देण्यात आला. तर एस एस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत तिकीट नव्हतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एसएस राजामौली यांनी प्रत्येक तिकिटासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले. ऑस्कर अवॉर्ड पाहण्यासाठी राजामौली यांना प्रत्येक तिकिटासाठी २५ हजार डॉलर्स म्हणजे प्रत्येक तिकीटासाठी सुमारे २० लाख मोजावे लागले आहेत. आता हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.