बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निधि अग्रवालच्या रोमॅण्टिक केमेस्ट्रीने भरलेलं ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणं अखेर रिलीज झालंय. अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचं रीक्रिएटेड वर्जन असलेलं ‘साथ क्या निभाओगे’ सॉंग रिलीज होताच गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या गाण्याने प्रेक्षकांच्या ९० च्या दशकातील जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सोनू सूदच्या या गाण्यासाठी त्याचे फॅन्स बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. या गाण्याने युट्यूबवर लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केलाय.
सोनू सूदच्या या गाण्यात खूपच इंटरेस्टिंग आणि खास एलिमेंट दिसून आले. दिग्दर्शक फराह खान हिने या गाण्याची कोरिओग्राफी आणि डायरेक्शन केलंय. पंजाबच्या हिरवाईत शूट केलेल्या या गाण्यात प्रेमींची कहाणी दाखवण्यात आलीय. या गाण्यात सोनू सूदने एका शेतकऱ्याची भूमिका साकारलीय, जो पुढे जाऊन एक पोलिस अधिकारी बनत असतो.
अस्सल देसी लव्ह स्टोरीचा तडका
फराह खान दिग्दर्शित या गाण्यात एक देसी लव्हस्टोरी दाखवण्यात आलीय. गाण्याच्या सुरूवातीला सोनू सूद एका पोलिस अधिकाऱ्याच्या वेशभूषेत दिसतो. सोनू सूद एका आरोपीला पकडण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी निधिची भेट होते. ही भेट त्यांची खूप वर्षानंतरची असते. खूप वर्षानंतर एकमेकांना पाहून त्या दोघांच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. त्यानंतर गाणं फ्लॅशबॅकमध्ये जातं. गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये सोनू सूद आणि निधि यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. सोनू निधिला प्रपोज करण्यासाठी तिच्या घरी जातो, पण त्यानंतर असं काही घडतं की ते दोघे वेगळे होतात. पण इतक्या वर्षानंतर झालेल्या भेटीनंतर मात्र ते दोघे पुन्हा एकत्र येतात, असा हॅपी एन्डींग दाखवण्यात आलाय. या गाण्यातला शुद्ध देसी रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला.
आणखी वाचा : करीना कपूरने पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना आमिर खानसोबत केला होता रोमॅण्टिक सीन
या गाण्याविषयी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, “हॅपी न्यू इअरमध्ये फराहसोबत काम करण्यापासून ते 1990 च्या दशकात रेडिओवर अल्ताफ राजाची मूळ गाणी ऐकण्यापर्यंत सर्व जुन्या आठवणी या गाण्याने ताज्या झाल्या आहेत. तसंच पंजाबमध्ये हे गाणे शूट केल्याने मला घरची आठवण येत होती. मला आशा आहे की आमची मेहनत फळाला येईल आणि प्रेक्षकांना हे गाणे आवडेल.”
गाणं रिलीज होताच झालं हिट
गायक अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचं ९० च्या दशकात हिट गाणं ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याचं हे रीक्रिएट व्हर्जन आहे. काळ बदलला असला तरी या गाण्याची क्रेझ मात्र अद्याप तशीच आहे. याचा पुरावा सध्या याचं रीक्रिएट व्हर्जनमधलं गाणं देतंय. हे गाणं रिलीज होताच काही तास उलटले नाही तर या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. या गाण्याने युट्यूबवर आतापर्यंत ८ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. सोशल मीडियावर सुद्धा हे गाणं जोरदार व्हायरल होऊ लागलंय. तसंच सोनू सूदचे फॅन्स लाखोंनी कमेंट्स करत त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत.
सोनू सूद बद्दल सांगायचं झालं तर १९९१ मध्ये रिलीज झालेल्या कालाझागर’ या तेलुगु चित्रपटातून त्याने अभिनयाला सुरूवात केली होती. त्यानंतर लागोपाठ अनेक तेलुगु चित्रपटात आपल्या अभिनयाचा जादू दाखवल्यानंतर ‘शहीद-ए-आजम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘युवा’ आणि ‘आशिक बनाया आपने’, ‘जोधा अकबर’ आणि ‘दबंग’ सारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.