‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाचा ट्रेलर कधी येणार याचीच उत्सुकता सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. या सिनेमाशी निगडीत अजून एक खास गोष्ट समोर आली आहे. मराठी अभिनेता मयुरेश पेम या सिनेमात सचिनच्या भावाची, नितीन तेंडुलकरांची भूमिका साकारणार आहे.
मयुरेशच्या ‘ऑल दि बेस्ट २’ या नाटकाचा एक प्रयोग सुरू असताना ते नाटक पाहायला ‘सचिन – अ बिलियन ड्रीम्स’चे दिग्दर्शक जेम्स अर्स्किन गेले होते. जेम्सना मयुरेशचं काम फार आवडलं आणि त्यांनी सचिनच्या सिनेमात नितीन यांच्या भूमिकेसाठी मयुरेशला विचारलं.
मयुरेशने या सिनेमासाठी खास मेहनतही घेतली. या सिनेमासाठी अनेक वर्कशॉप्स आणि अभिनयाचे धडे त्याने नव्याने गिरवले. हॉलिवूडचा दिग्दर्शक, सचिन तेंडूलकर आणि सिनेमाचा संगीतकार ए.आर.रेहमान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली यामुळे मयुरेश सध्या भलताच खूश असेल यात काही शंका नाही.
मयुरेशला स्वतःला क्रिकेटची आवड नाही, पण त्याच्या बाबांना आणि आजोबांना क्रिकेटचे वेड असल्यामुळे मयुरेशने या सिनेमात काम करुन त्यांचं स्वप्न पूर्ण केलं असचं म्हणावं लागेल. डॉक्युमेंट्री फिचर प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमात सचिनची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. यात सचिनच्या चाहत्यांना त्याच्या अबिनयाची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. मे महिन्याच्या २६ तारखेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.