…आणि डॉ काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत बॉलिवूड चित्रपटांना स्पर्धा दिल्यानंतरही मराठी चित्रपटांवर अद्याप अन्याय सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी भाई चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता सचिन पिळगावकर यांची प्रमूख भुमिका असलेल्या ‘लव्ह यू जिंदगी’ चित्रपटाला स्क्रीन मिळवण्यासाठी घरघर करावी लागत आहे.
‘लव्ह यू जिंदगी’ चित्रपट 11 जानेवारीला रिलीज होणार आहे. मात्र स्क्रीन मिळत नसल्याने निर्मात्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मराठीला डावलून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना स्क्रीन दिली जात असल्याचा आरोप केला आहे.
‘लव्ह यू जिंदगी’ चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत कविता मेढेकर, प्रार्थना बेहरे आणि अतुल परचुरेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. 11 जानेवारीला ‘लव्ह यू जिंदगी’ चित्रपटासोबत ‘उरी..द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बटालियन 609’, ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘रंगीला राजा’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांना तगडी स्पर्धा असणार आहे.