१२ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाला शुक्रवार, ३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या सिनेकारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘थर्ड आय’ चित्रपट महोत्सव आयोजकांच्या वतीने सचिन यांचा सत्कार केला जाणार आहे. मराठी चित्रपटांचे शतकमहोत्सवी वर्ष आणि सचिन यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव असा दुर्मीळ योग जुळून आला आहे.
रवींद्र नाटय़ मंदिर मिनी थिएटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता ‘थर्ड आय’ महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई दूरदर्शनचे संचालक मुकेश शर्मा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक सुप्रभा अग्रवाल तर अध्यक्ष म्हणून ‘एशियन फिल्म फाऊंडेशन’चे अध्यक्ष किरण शांताराम उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर दिग्दर्शक लाऊ मा हो यांचा ‘कोएन ऑफ स्प्रिंग’ हा व्हिएतनामी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यंदा प्रथमच व्हिएतनामी चित्रपटाने ‘थर्ड आय’ महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.

Story img Loader