अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर हे गेली ६० वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदीतही सचिन पिळगांवर यांचं योगदान मोठं आहे. २५ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यावर ‘गीत गाता चल’, ‘नदिया के पार’सारख्या चित्रपटांतून सचिन यांना ब्रेक मिळाला आणि नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. इतकी वर्ष हरतऱ्हेचे चित्रपट केल्यानंतर आता सचिन पिळगांवकर ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये सचिन पिळगांवर यांनी जगदीश गुरव ही एका धूर्त, कपटी नेत्याची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या दोन्ही सीझनवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता याच्या तिसऱ्या सीझनची प्रचंड चर्चा आहे. यातील सचिन पिळगांवकर यांचं पात्रं लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडलं आहे.
आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी होणार ‘असुर’चा सीझन २ प्रदर्शित; अगदी मोफत पाहायला मिळणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर
तब्बल ६ दशकांच्या आपल्या करिअरमध्ये सचिन यांनी वेगवेगळे चित्रपट लिहिले, दिग्दर्शित केले, अभिनयही केला. नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधतांना सचिन पिळगांवकर यांनी निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं. याविषयी बोलताना ते म्हणाले, “एखादी व्हिस्कीची बाटली आणि एखाद्या अभिनेत्याला एक्सपायरी डेट असते असं मला अजिबात वाटत नाही. यामध्ये मी दोन्ही गोष्टींचा सन्मान करतोय. मला वाटतं काही गोष्टी या सदैव आपल्यातच राहतात त्यात काहीच गैर नाही, फक्त तुम्ही स्वतःला इतरांवर लादायचा प्रयत्न करता कामा नये. जे तुमच्या वयाला शोभत नाही ते तुम्ही न केलेलंच बरं. माझ्यासारखी व्यक्ती तर निवृत्तीबाबत विचारही करू शकत नाही.”
याबरोबरच या मुलाखतीदरम्यान त्यांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील इतर कलाकारांबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांबद्दलही खुलासा केला. आपल्या पात्राबद्दल बोलताना सचिन पुढे म्हणाले, “जेव्हा मी कट्यार काळजात घुसली हा चित्रपट केला तेव्हा मला वाटलं की याहून आव्हानात्मक आणखी काहीच येणार नाही, पण मी चुकीचा विचार केला. त्यानंतर लगेच माझ्याकडे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ आली अन् एक वेगळीच वाट खुली झाली. त्यामुळे या अशा गोष्टी घडत असतात असं मला वाटतं.” ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीझन ३ हा २६ मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.