अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी कायमच चर्चेत असते. नुकतंच सचिन पिळगावकरांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ते चर्चेत आले आहे.
स्टार प्लस वाहिनीवरील ‘नच बलिये’ या शो कायमच प्रसिद्धीझोतात असतो. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाचे पहिले पर्व २००५ मध्ये सुरु झाले. विशेष म्हणजे या पर्वात मराठी सिनेसृष्टीची लाडकी जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर विजेते ठरले होते. १९ डिसेंबर २००५ मध्ये या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमीअर सोहळा पार पडला होता.
आणखी वाचा : “अनेकांनी प्रयत्न केला पण…” ‘अशी ही बनवाबनवी’च्या रिमेकच्या प्रश्नावर सचिन पिळगावकरांचे स्पष्ट उत्तर
सचिन-सुप्रिया या जोडीने आपल्या चित्रपटांतून नृत्यातून सर्वांचीच मन जिंकली. या दाम्पत्याने अनेक डान्सर्सना मागे टाकून ‘नच बलिये’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं विजेतेपद पटकावलं होतं. आता या निमित्ताने सचिन पिळगावकरांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ‘नच बलिये’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे.
याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. “१७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आम्हाला हे मिळालं होतं. त्यावेळी आम्हाला भरघोष मत देणाऱ्यांचे आभार. याचा अनुभव फारच सुखद होता. लव्ह यू ऑल” असे त्यांनी यात म्हटले आहे.
दरम्यान सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरत घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ यासह अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया ही मुलगी आहे. श्रियाही मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून अनेक नावाजेल्या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. श्रियाचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे.