एकविसाव्या शतकातही आपण मुलगा-मुलगी यांच्यात अनेकदा भेद करतो. मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’ ही भावना अनेकांच्या मनात इतकी पक्की रुजली आहे, की ‘मुलगा’ होण्याची आस लागलेली असते. आज असं एकही क्षेत्र नाही की, ज्या ठिकाणी स्त्रिया पोहचल्या नाहीत. बँक, महाविद्यांमधील नोकरी तर सोडाच, परंतू अनेक आव्हानात्मक क्षेत्रातही तिने पाऊल टाकले आहे. आपला ठसा उमटविला आहे. मात्र तरीही स्त्री-पुरुष समानता हा मुद्दा अनेकदा चर्चेत येत असतो.
या स्त्री-पुरुष समानतेबद्दल अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी ‘माझ्या मते स्त्री आणि पुरुष हे समान नाहीत’ असं वक्तव्य केलं. पुढे ‘स्त्री ही सर्वार्थाने श्रेष्ठ असल्याचेदेखील त्यांनी म्हटलं. सचिन पिळगांवकर प्रस्तुत ‘स्थळ’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात स्त्री-पुरुष समानतेबद्दल भाष्य करण्यात आले. याच चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकरांनी मिरची मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल भाष्य केलं.
यावली सचिन पिळगांवकर असं म्हणाले की, “आपल्याकडे म्हणतात की, स्त्री आणि पुरुष समान आहेत. तुम्ही त्यांना समान वागवलं पाहिजे. स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना वरचा दर्जा देता. तर तसं नाहीये. स्त्री आणि पुरुष समान आहेत, हे मी मनात नाही. कारण स्त्री ही सर्वार्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रीचं स्थान वर आहे आणि पुरुषाचं स्थान तिच्यापेक्षा खाली आहे. आपण हे मानलं पाहिजे. परमेश्वरानेही हे सिद्ध केलं आहे. कारण आई बनण्याचं सौभाग्य त्याने फक्त आणि फक्त स्त्रीला दिलं आहे. दुसऱ्या कुणाला दिलेलं नाही. यातून हे सिद्ध होतं की, स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि ते लोकांनीही मानलं पाहिजे.”
यापुढे त्यांनी म्हटलं की, “बरं पुरुषाला हे माहित नव्हतं अशातला भाग नाही. पुरुषाला हे सर्व माहिती होतं. खूप पुर्वीपासून माहिती होतं. त्याला कळलं की, ही आपल्या पेक्षा खूप शक्तिशाली आहे. म्हणून त्याने काय केलं. तिला घरी बसवलं. मुलं सांभाळा, जेवण करा, घरची साफसफाई करा ही कामे तिला दिली. बाकीची बाहेरची कामे मी पाहीन. बाकी दुनियेत तो जाणार पण तिने घराच्या बाहेर पडायचं नाही. कारण ती घराबाहेर पडली तर तिला नवीन संधी मिळणार. तिला शिकता येणार, तिला योग्य-अयोग्य समजणार आणि तिला जर समजलं तर ती पुरुषावर वर्चस्व करणार.”
यापुढे सहकिन पिळगांवकरांनी म्हटलं की, “या सगळ्या प्रथा त्यामुळेच सुरू झाल्या की, मुलीने शिकून करायचं काय? शेवटी लग्नच तर करायचं आहे. पोरंबाळं तर सांभाळायची आहेत. धुणीभांडी तर करायची आहेत. हेच काम आहे बाईचं… दूसरं काय काम आहे? लाज नाही वाटत. तुम्ही असं स्त्रियांना वागवता. त्यामुळे मी याच्या विरुद्ध आहे”. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्याशी अनेक चाहत्यांनीही संमती दर्शवली आहे.