हिंदी चित्रपटाचा ‘मुहूर्त सोहळा’ ही पूर्वी फार मोठी व त्या सिनेमावाल्यांच्या आनंदाला प्रचंड भरती येणारी अशी अफलातून संस्कृती होती. त्यासाठी वावरताना मिळणारा ‘फिल’ काही वेगळाच असे.. मेहबूब स्टुडिओत राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’चा १९९० च्या ऑक्टोबरमधला मुहूर्त त्याच ‘चारीं’चा! संतोषी या चित्रपटापासून विनोदपटाकडे वळल्याने मुहूर्त दृश्यात तो कसे हसवतोय हे जसे महत्त्वाचे तसेच त्यावेळी नावारूपाला येत असलेल्या आमिर-सलमान-करिश्मा-रविना अशा चौघांना त्याने एकत्र आणले म्हणून कौतुकाचे व कुतूहलाचेही. निर्माता विनय सिन्हाही उत्साहात, त्याच्यामुळे काही मराठी सिनेमावालेही हजर होते. वातावरणात रंगत वाढत असतानाच सगळ्यांनाच ‘जोरका झटका धीरेसे लगा’…. चक्क सचिन तेंडुलकचे आगमन झाले. तो तेव्हा क्रिकेटमधला वेगाने प्रकाशात राहणारा तारा होता. वागण्यात केवढी तरी नम्रता, ‘गले लगावो’ अशा फिल्मी संस्कृतीत सचिनची पावले मात्र वेगळी पडत होती आणि त्याच्या आगमनामुळे प्रत्येकजण ‘अंदाज अपना अपना’ जणू व्यक्त करीत आहेत  हे त्यांच्या चेहऱयावर दिसत होते. करिश्माचा आनंद तर केवढा बघा, आमिर तसा लहानपणापासून क्रिकेट वेडा, वांद्र्याच्या पाली हिलवर गली क्रिकेटचा आनंद घेत मोठा झालेला. याक्षणी फोटोग्राफर्सना  उत्तम छायाचित्र लाभले तेव्हा असे छायाचित्र हिच बातमी असे त्यामुळे सचिनचा त्यावेळचा वावर आणि थोड्या वेळातच सेटबाहेर पडणे हाच मजकूराचा ‘आँखो देखा हाल’ ठरला…सचिन मेहबूबबाहेर पडला तरी त्याचे या मुहूर्ताच्या वेळचे त्याचे अस्तित्व जाणवत होते. कुठेही असला तरी सचिनच ‘सबसे बडा खिलाडी’..

Story img Loader