मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गेली अनेक वर्ष त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल’ची पाटी असते. या प्रवासात त्यांनी अनेक विक्रम केले. आज ते एक नवा विक्रम करत आहेत.
आणखी वाचा : “कोणता हा ॲटीट्युड…!”; अभिजीत खांडकेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेते प्रशांत दामले यांचा १२ हजार ५०० वा विक्रमी प्रयोग आज, रविवारी श्री षण्मुखानंद सभागृहात दुपारी रंगत आहे. यानिमित्त चहूबाजूने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनीही त्यांना विविधप्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच सचिन तेंडुलकर याने प्रशांत दामले यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
सचिन तेंडुलकर याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर प्रशांत दामले यांचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२,५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
हेही वाचा : “मी पोहोचलो आहे..” १२,५०० व्या विक्रमी नाट्यप्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल
सचिन तेंडुलकरची पोस्ट ही पोस्ट शेअर करत प्रशांत दामले यांनीही त्याला उत्तर दिलं. ती पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं, “खूप खूप आभार, सचिन.” आता सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरने प्रशांत दामले यांच्यासाठी केलेली पोस्ट आणि प्रशांत दामले यांचे त्या पोस्टवरील उत्तर हे दोन्हीही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.