मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव आता क्रिकेटपुरते मर्यादित राहिलेले नाही. सचिन तेंडुलकर नावाचा ‘मिडास टच’ ज्या ज्या गोष्टींना लाभतो, त्याचे सोने होते. क्रिकेटच्या विश्वातील या देवाने जाहिरातीच्या माध्यमावरही आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली. जाहिरातीपाठोपाठ आता सचिन बॉलीवूडच्या मोठय़ा पडद्यावर ‘नवी इनिंग’ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिनच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी चित्रपटात स्वत: सचिनच काम करणार आहे.
‘२०० नॉट आऊट’ ही प्रॉडक्शन कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत असून या कंपनीने आतापर्यंत १५० हून अधिक जाहिराती आणि लघुपट तयार केले आहेत. कंपनीने वल्र्ड स्पोर्ट्स ग्रुपकडून सचिन तेंडुलकर याच्यावर चित्रपट निर्माण करण्यासाठी हक्क विकत घेतले असल्याचे सांगण्यात येते. वल्र्ड स्पोर्ट्स ग्रुप हा सचिनसाठी ब्रॅण्ड मॅनेजमेंट आणि व्यावसायिक गोष्टींसाठी काम पाहतो. हा चित्रपट संपूर्ण देशभरात दोन हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी चित्रपटाचे जवळपास अर्धेअधिक चित्रीकरण पार पडले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अन्य महत्त्वाची जबाबदारी प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक जेम्स एस्किर्न सांभाळणार आहेत.
चित्रपटासंदर्भातील सर्व जुळवाजुळव सुमारे एक वर्षभरापासून सुरू होती. सचिनच्या जीवनावर असलेल्या या चित्रपटात स्वत: सचिन अभिनय करणार असल्याने सचिनचे चाहते आणि प्रसार माध्यमांसाठीही तो एक औत्सुक्याचा विषय ठरला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. चित्रपटात सचिनसह विविध क्षेत्रांतील काही दिग्गजही पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाची आणखी एक खास बाब म्हणजे यात सचिनशी संबंधित काही व्हिडीओ तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या सामन्यातील सचिनच्या खेळीचे व्हिडीओही यात देण्याचा प्रयत्न निर्मिती संस्थेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी विविध देशांच्या क्रिकेट बोर्डाशीही संपर्क साधला जात आहे.
जेम्स एस्किर्न यांनी आतापर्यंत खेळांशी संबंधित व्यक्तींवर अशा प्रकारे काम केले असून तो अनुभव विचारात घेऊन त्यांनाच सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Story img Loader