बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सुसाइट ऑर मर्डर’ असे ठेवण्यात आले आहे. आता या चित्रपटात टिक-टॉक स्टार सुशांतची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचिनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत तो चित्रपटात ‘द आउटसायडर’ची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शामिक मौलिक करणार आहेत. तसेच चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.
यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच हे पोस्टर प्रदर्शित करत विजय शेखर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखती मध्ये त्यांनी चित्रपटात कोणत्या गोष्टी अधोरेखीत करण्यात आल्या आहेत हे सांगितले होते. ‘मी हा चित्रपट यासाठी करत आहे जेणे करुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे मोठे स्टार्स आणि प्रोडक्शन हाउसची एकाधिकारशाही आहे ती संपवली पाहिजे या हेतूने मी हा चित्रपट बनवत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘आज इंडस्ट्रीमध्ये जी बाहेरुन मुले येतात त्या मुलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या गँगमुळे योग्य ती संधी मिळत नाही. या गँगला मी तोडू इच्छितो. माझ्या कथेमध्ये ते सगळं असणार आहे जे सुशांतसोबत घडले आहे. त्या मुलाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले. त्याच्याकडून एकापाठोपाठ एक चित्रपट काढून घेण्यात आले’ असे त्यांनी पुढे म्हटले होते.
या चित्रपटात सुशांतचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.