– योगेश मेहेंदळे
नेटफ्लिक्सवर जुलैमध्ये सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आली आणि तेव्हापासून ही सीरिज काही ना काही कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडली. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन सब टायटल्सशिवाय प्रदर्शित करण्यात आला. आता या सीझनला हिंदी व इंग्रजी सबटायटल्स देण्यात आली आहेत. मात्र, इंग्रजी सबटायटल देताना एक चूक अक्षम्य झाली असून त्यावरून पुन्हा ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. जितेंद्र जोशीनं साकारलेल्या पोलिस हवालदाराच्या तोंडी मी मराठ्याची अवलाद आहे असा एक डायलॉग आहे. याचं इंग्रजी भाषांतर सबटायटलमध्ये “I’m a whore’s son” असं अत्यंत चुकीचं व आक्षेपार्ह करण्यात आलं आहे.
ही चूक कशी झाली, भाषांतर हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केलंय की ही भाषांतरकर्त्याकडून झालेली चूक आहे याचा उलगडा यथावकाश होईलच, परंतु अत्यंत संवेदनशील असा हा विषय असल्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये असलेल्या अत्यंत भडक संवादांवरून व उत्तान दृष्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या सीरिजमध्ये दिलेल्या राजकीय व्यक्तींच्या संदर्भावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच, अशा सीरिजही भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली असाव्यात यासाठीही याचिका दाखल करण्यात आली होती.
त्यापाठोपाठ #MeToo च्या वादग्रस्त प्रकरणातही ही वेबसीरिज अडकली व तिच्या दुसऱ्या सीझनचं प्रक्षेपण रखडलं. फँटम फिल्मचे सहसंस्थापक व एक लेखक अशा दोघांविरोधात लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आणि ही सीरिज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली. या पुढचा मार्ग कसा असेल याची आम्ही चाचपणी करत आहोत, असं स्टेटमेंट नेटफ्लिक्सनं त्यानंतर दिलं होतं. आता, मराठ्याची अवलाद किंवा मराठ्याचा मुलगा असं अभिमानानं सांगणाऱ्या काटेकरच्या संवादाचं भाषांतर मी वेश्येचा मुलगा असं झाल्यानं सेक्रेड गेम्सची वादाची परंपरा सुरूच राहील असं दिसतंय.