छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलला ओळखले जाते. ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. पनवेलचा सागर म्हात्रे इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला. या शोचा विजेता ठरल्यानंतर नुकतंच सागरने यावर भावूक होत प्रतिक्रिया दिली.
सागरने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वासाठी सागरची घोषणा झाली त्यादरम्यान आहे. यावेळी सागरने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी सागर म्हणाला, “मला आज इंडियन आयडलची जी ट्रॉफी मिळाली आहे. त्यासाठी हे सर्वजणही पात्र आहेत. हे सर्व माझ्या फार जवळचे आहेत.”
“मी जरी आज ही स्पर्धा जिंकलो असलो तरी मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी इतर स्पर्धकांनी खूप साथ दिली. माझे स्पर्धक मित्र, अजय अतुल सर, म्युझियन यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे हे शक्य झाले. ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केले, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे”, असेही सागरने म्हटले.
“इंडियन आयडलमध्ये १४ जण होते. त्या सर्वांचे ही ट्रॉफी जिंकावी हे एकच स्वप्न होते. पण मी स्वत:ला फार नशिबवान समजतो की मला ही ट्रॉफी मिळाली. पण इतर सर्वजण माझ्या इतकेच या ट्रॉफीसाठी पात्र ठरतात. ही ट्रॉफी माझ्या एकट्याची नाही, तर ती आम्हा सर्वांची आहे. कैवल्य, अविनाश, शुभम आणि देवश्री या चौघांनी मला खूप साथ दिली. माझ्या गुरुंचेही मला विशेष आभार मानायचे आहेत”, असेही सागर म्हणाला.
“तसेच तर आता नाव घ्यायला खूप जण आहेत. पण त्यांची नाव घेणे शक्य नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. इतकी लोक माझ्यावर प्रेम करतात याचा मला फार अभिमान वाटतो. तो मी कायम जपण्याचा प्रयत्न करेन. आगरी कोळी बांधवांनी मला फार पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे हे शक्य झाले. मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद”, असेही सागरने सांगितले.
दरम्यान इंडियन आयडलमध्ये जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले होते. त्यातील पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे. सागरच्या आवाजाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. सागर म्हात्रे हा पेशाने इंजिनियर आहे. तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव त्याला पडले होते. सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.