आठ वर्षांपूर्वी “सही रे सही’ने पहिल्यांदा रंगमंचावर पदार्पण केले. तेव्हापासून, “सही’ आणि “हाऊसफुल्ल’चा “बोर्ड’ यांचे नाते कधी तुटले नाही. “सही’मध्ये विविधरंगी भूमिका साकारणारा अभिनेता भरत जाधव आणि लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेंने या नाटकाद्वारे अवघ्या महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींवर जादू केली. या नाटकाने अडीच हजार प्रयोगांचा टप्पादेखील आता पार केला आहे.
मराठी नाट्यप्रेमींनी या नाटकाला भरभरून प्रेम दिल्यानंतर केदार शिंदे आता हे नाटक हिंदी रंगमंचावर घेऊन येत आहे. भरत जाधवने याबाबत आपल्या टि्वटर आणि फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. हिंदी सही रे सहीमध्ये भरत जाधव साकारत असलेली प्रमुख भूमिका बॉलीवूड अभिनेता शर्मन जोशी साकारणार आहे. मराठीत मी आहेच की….!”, असे भरतने फेसबुकवर पोस्ट केले आहे. हिंदीतील नाटकाचे दिग्दर्शन स्वतः केदार शिंदेच करणार आहेत. केदारचे हे नाटक हिंदीत पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शर्मन जोशीसारखा बहुरंगी अभिनेता आणि केदारचं दिग्दर्शन या केमिस्ट्रीमुळे मराठीप्रमाणे हे नाटक हिंदीतही हाऊसफुल्ल होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

Story img Loader