‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. “या मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांनी मला मानसिक त्रास दिला. माझे रॅगिंग करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ त्यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केले आहेत.
अन्नपूर्णा विठ्ठल यांनी शेअर केलेले हे सर्व व्हिडीओ हिंदीत आहेत. अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, “मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या महिन्यात सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. मात्र ही मालिका सोडल्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात अशी अफवा पसरवण्यात आली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारख्या छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते. सुनिल बर्वे हा मराठीतील मोठा अभिनेता आहे. पण त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,” असे त्यांनी सांगितले.
“मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का? मग जर हिंदी, तेलुगु कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये ही मानसिकता ठेवत असाल, तर अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगु सिनेसृष्टीत काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.
“तसेच दिग्दर्शक भरत गायकवाड अनेकदा त्यांना म्हातारी म्हणून आवाज द्यायचे. तसेच ते त्यांना सेटवरही अश्लील शिवीगाळ केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या मालिकेत को-स्टार नंदिता पाटकर यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत. मला खोलीतून बाहेर काढण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नंदिता टॉयलेट अस्वच्छ ठेवायची,” असे काही आरोप त्यांनी केले आहेत.
अन्नपूर्णा या गेल्या एक वर्षापासून ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मराठी मालिका करत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अन्नपूर्णा या मुळात दक्षिण भारतीय आहेत. गेल्या 25 वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अन्नपूर्णा यांची ही पहिलीच मराठी मालिका होती.
“मला या मालिकेच्या सेटवर इतका त्रास देण्यात आला की डिप्रेशनमध्ये गेली. अनेकदा मला धमक्या देण्यात आल्या. मला अभिनय येत नाही, उद्यापासून हिच्यासाठी संवाद लिहू नका. सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण टीमने एका आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड त्रास दिला आहे. त्यांचे कधीही चांगले होणार नाही,” असेही अनेक आरोप त्यांनी केले आहेत.
मात्र सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी मालिकेच्या निर्मात्याच्या विरोधात मानसिक त्रास आणि छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीस ठाण्यात 22 नोव्हेंबरला याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर मालिकेच्या टीमकडून, निर्माते, दिग्दर्शक किंवा कोणत्याही कलाकारांकडून भाष्य करण्यात आलेले नाही.