निवडणुकांचे वारे वाहू लागले की प्रचारफेऱ्या आणि सभांमध्ये तारेतारकांचे चेहरे दिसू लागतात. गर्दी जमविण्याचे ते हुकमी साधन असते. ज्याचा प्रचार करायचा त्या उमेदवाराशी अथवा पक्षाशी प्रचार करणाऱ्या कलाकाराचा काही संबंध असतोच, असे नाही. या कलाकारांसाठी प्रचारसभा अथवा रोड शो हीसुद्धा एक ‘इव्हेन्ट’च असते. एक प्रकारे कॅमेरा नसलेले शूटिंगच असते. निवडणुकांची रणधुमाळी तापू लागली असतानाच बॉलीवूड आणि मराठी चित्रसृष्टीतही कोण कोणाचा प्रचार करणार याची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेत मराठी सिनेमातील ‘बिकीनी गर्ल’ अर्थात सई ताम्हणकरने आपल्या बिनधास्त स्वभावाला अनुसरून एक विधान करून खळबळ माजवून दिली आहे. ‘जो जास्त पैसे देईल, मी त्याचा प्रचार करणार’ असे स्पष्ट शब्दांत सईने जाहीर केले आहे.
ठाण्यात अलीकडेच एका खासगी समारंभात सईला ‘तुला कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आवडेल’ असे पत्रकारांनी विचारले. त्यावर सईने कोणतीही भीडभाड न बाळगता ‘जो पक्ष मला जास्त पसे देईल त्याचा प्रचार मी करीन’ असे थेटच सांगितले. निवडणुकांच्या काळात सर्वच पक्ष जनतेला गोडगोड आश्वासने देतात. मग विसरून जातात. मग आम्ही कलाकारांनीच का मागे राहायचे? असा सईचा प्रश्न होता. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात सई कोणत्या पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या व्यासपीठावर अवतरते ते बघणे आता कुतूहलाचे बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा