अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सईने आता पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सई सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सई चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता सई पुन्हा एकदा एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. सईने काल सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. ते पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता सईने चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. हा टीझर ‘मीमी’ या चित्रपटाचा आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन गर्भवती असल्याचे दिसत आहे. ‘मीमी’ हा चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘मीमी’ चित्रपटात एका सरोगेट स्त्रीच्या भूमिकेत क्रिती दिसणार आहे. या स्त्रीला अभिनेत्री व्हायचे असते आणि या दरम्यान ती एका जोडप्याला भेटते आणि ती सरोगेट आई होण्याचा निर्णय घेते. त्यानंतर अभिनेत्री होण्याच्या स्वप्नापासून एक सरोगेट आई होई पर्यंत तिच्या आयुष्यात काय बदल होतात हे त्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट
या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करणार आहेत. दरम्यान, सई ‘समांतर २’ या सीरिजमध्ये दिसली होती.