मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट (Dharavi Cylinder Explosion) झाल्याचे वृत्त आले आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सोमवारी रात्री सिलेंडर घेऊन जाणारा एक ट्रक धारावीतील नो पार्किंगमध्ये पार्क करण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि यामुळे ट्रकमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं.

ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक असे सिलेंडरचे अनेक स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला. एकूण १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा डोंब उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटरपर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाले. या आगीचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सई मांजरेकरनेही (Saiee Manjrekar) धारावी परिसरातल्या या आगीचा एक भयानक व्हिडीओ शेअर केला आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या आगीचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “धारावीमध्ये हे काय चाललंय? आशा आहे की, सगळे सुरक्षित असतील.” सईने शेअर केलेला हा व्हिडीओ भयावह आहे. या व्हिडीओत आगीचा मोठा भडका उडल्याचे पाहायला मिळत आहे.

सई मांजरेकर इन्स्टाग्राम स्टोरी
सई मांजरेकर इन्स्टाग्राम स्टोरी

सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते. अशातच तिने धारावीमधील आगीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत आगीची दाहकता आणि भीषणता दिसत आहे, त्यामुळे यात स्थानिक लोक सुरक्षित असण्याबद्दल तिने आशाही व्यक्त केली आहे.

सायनच्या PNGP कॉलनीत काल (सोमवारी) रात्री सिलेंडर स्फोटाची भीषण घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बराच परिसर जळून खाक झाला आहे. स्फोटानंतर इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत इतर गाड्या लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी आग काही वेळातच आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यात एकही व्यक्ती जखमी झालेली नाही.

तसंच साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे आणि घटनेच्या कारणाबद्दल अद्याप कोणतीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही. चौकशी केल्यानंतर त्याबद्दल माहिती देऊ, असेही पोलिसांनी सांगितले.