अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी एकाच प्रकारच्या भूमिका करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळणे हे अधिक आवडीचे आणि आव्हानात्मकही असते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा प्रत्येक कलाकार असा प्रयत्न करत असतो. आगामी ‘हमशकल’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सैफअली खान हा पुन्हा एकदा गुजराती युवकाची भूमिका रंगविणार आहे. सैफचा खास ‘गुज्जू’ अवतार पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पात्रांची निवड करताना काही ठोकताळे निश्चित केलेले असतात. म्हणजे नोकर किंवा कामवाली दाखवायची असेल तर ती व्यक्तिरेखा ‘मराठी’ दाखविली जाते. नेपाळी माणसे ही नेहमी ‘गुरखा’च असतात. किंवा चित्रपटातील नायक हा ‘पंजाबी’ कुटुंबातीलच दाखवला जातो. हिंदी चित्रपटातून ‘मराठी माणूस’ खिल्ली उडविण्यासाठीच दाखविला जातो. आता ‘हमशकल’मध्ये सैफअली ‘गुज्जू’ कसा रंगवितो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सैफने ‘कल हो ना हो’ या चित्रपटात गुजराती युवकाचीच भूमिका या अगोदर केली होती.
या चित्रपटात सैफ गुजराती भाषेत बोलतानाही दिसणार असून त्याची ही व्यक्तिरेखा विनोदी असल्याचे सांगण्यात येते. गुजराती भाषेत बोलणे हे सैफसाठी फारसे कठीण नाही. चित्रपटातील या भूमिकेची तयारी म्हणून त्याने सेटवर गुजराती भाषेत बोलणेही सुरू केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि पूजा एंटरटेंटमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नडीयाडवाला यांचे आहे. चित्रपटात रितेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बासू, ईशा गुप्ता, तमन्ना आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा