Saif Ali Khan Meets Auto Driver Bhajan Singh : अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात तब्बल पाच दिवस उपचार सुरू होते. उपचारानंतर काल सैफला काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. दरम्यान डिस्चार्ज मिळण्यापूर्वी काही वेळ आधी सैफने त्याला रुग्णालयात दाखल करणाऱ्या भजन सिंग राणा या रिक्षा चालकाची भेट घेत त्याला मिठी मारली. यावेळी सैफने रुग्णालयात दाखल केल्याबद्दल भजन सिंग यांचे आभार मानले. यावेळी सैफच्या आई शर्मिला टागोर याही उपस्थित होत्या. त्यांनीही यावेळी भजन सिंग यांचे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भेटीदरम्यान सैफ अली खानने रिक्षा चालक भजन सिंग यांच्याबरोबर काही फोटोही काढले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, सैफने त्याची घरात काम करणारी आणि जेहची आया एलियाम्मा फिलिप यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानंतर काल घरी पोहोचल्यानंतर सैफ अली खानने आया अलीअम्मा फिलिप यांचीही भेट घेतली. हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला तेव्हा अलीअम्मा फिलिप घटनास्थळी उपस्थित होत्या.

अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर, त्याला लीलावती रुग्णालयात घेऊन जाणारे रिक्षा चालक भजन सिंग म्हणाले, “त्यांनी माझे आभार मानले. त्यांच्या आईनेही माझे कौतुक करत, मी चांगले काम केल्याचे म्हटले. यावेळी मी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. मला खूप आनंद आहे की, इतक्या मोठ्या स्टार्सना भेटता आले. घटनेच्या रात्री मी पैशाचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. मला फक्त त्यांचा जीव वाचवायचा होता…”

मुंबई पोलिसांनी रविवारी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास नावाच्या या आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. आरोपीने सैफच्या पाठीवर चाकूने वार केले होते. चाकूचे एक टोक सैफच्या पाठीत घुसले होते.

या हल्ल्यानंतर भजन सिंग यांच्या रिक्षातून सैफला रक्तबंबाळ अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढला होता.

आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास (३०) मागील सात महिन्यांपासून भारतात राहत होता. तो कागदपत्रांची गरज भासणार नाही, अशा नोकऱ्या करत होता. त्याला रविवारी अटक केल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack auto driver bhajan singh hospital sharmila tagore heartwarming gesture aam