Saif Ali Khan Attack CCTV VIDEO : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचं प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर जबरदस्तीने किंवा कुठलीही मोडतोड न करता घरात घुसल्याचं दिसून आलं आहे. हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेने कला विश्वात एकच खळबळ माजली आहे. ही व्यक्ती घरात शिरली कशी? सैफवर हल्ला करण्यामागचा नेमका उद्देश काय? असे प्रश्न लोकांना पडले आहेत. दरम्यान, सैफच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हल्लेखोराचा घरात जाताना किंवा तिथून पळून जातानाचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. मात्र इमारतीच्या पायऱ्यांजवळील एका कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला आहे. या व्हिडीओच्या मदतीने पोलीस आता हल्लेखोराचा तपास करत आहेत.
या व्हिडीओत हल्लेखोरोचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. आता त्याचा फोटो घेऊन पोलीस तपास सुरू झाला आहे. हल्लेखोरानै सैफच्या घरात प्रवेश कसा मिळवला याबाबत पोलीस तपास चालू आहे. हल्लेखोर जबरदस्तीने घरात घुसल्याचं जाणवलेलं नाही, त्यामुळे हल्लेखोराला घरातील कोणीतरी मदत केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने सैफ अली खानच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी चालू आहे. दरम्यान, सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पायऱ्यांवरून खाली उतरताना कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजमधील एक फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. आरोपी मध्यरात्री २ वाजून ३३ मिनिटं व ५६ सेकंदांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीबद्दल अधिक माहिती अजून आलेली नाही.
हल्लेखोरोचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे.
सैफच्या घरात काय घडलं?
या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात असं दिसतंय की हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या फायर एस्केप पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. चोराला पाहून घरातील मदतनीस महिलेने आरडाओरड केली, तसेच तिने मदतीसाठी अलार्म वाजवला. त्यानंतर सैफ अली खान खोलीत गेला. तिथे त्याची चोराबरोबर झटापट झाली, यादरम्यान चोराने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले. दोघांच्या झटापटीवेळी घरातील मदतनीसही जखमी झाली आहे, तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला.