Saif Ali Khan discharged from Hospital : अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सैफला लीलावती रुग्णालयातून सोडण्यापूर्वी, पत्नी करीना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी सैफची बहीण सबा पतौडी हिने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत त्याला पूर्वीपेक्षा बरे वाटत असल्याचे सांगितले होते.

दरम्यान मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाणे येथून अटक केली होती. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली. १६ जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता. या दरम्यान त्याने विजय दास, बिजॉय दास, बीजे आणि मोहम्मद इलियास अशी अनेक नावे वापरली होती.

गुरुवारी १६ जानेवारी रोजी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर हा हल्लेखोर चोरीसाठी घुसला होता. यावेळी सैफ अली खानने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. तेव्हा हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफशिवाय या घटनेमध्ये त्याच्या घरातील मदतनीस सुद्धा जखमी झाली होती. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे लीलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

Story img Loader