Saif Ali Khan Health Update by Doctors of Lilavati Hospital : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरात घुसल्याचं प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोर सैफच्या घरात कसा शिरला? सैफवर हल्ला करण्यामागचा नेमका उद्देश काय? असे प्रश्न लोकांना पडले आहेत. तसेच सैफ अली खानची प्रकृती आता कशी आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, लीलावती रुग्णालयातील जे डॉक्टर सैफवर उपचार करत आहेत त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सैफच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली.
लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज उत्तामणी म्हणाले, “काल रात्री सैफ अली खान रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आला होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा तैमूर तिथे होता. सैफ जखमी असला तरी रुग्णालयात सिंहासारखा वावरला. चित्रपटात तो हिरोची भूमिका साकारतो. मात्र तो खऱ्या आयुष्यातही एखाद्या हिरोसारखाच वागत होता. त्याची प्रकृती आता बरी आहे”.
सैफच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितलं?
दरम्यान, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितीन डांगे म्हणाले, “सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्याची प्रकृती आता बरी आहे. दुखणं देखील कमी झालं आहे. आम्ही त्याला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आज त्याला अतिदक्षता विभागातून विशेष विभागात हालवलं आहे. आम्ही त्याला किमान आज लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्याच्या जखमा ताज्या असून संसर्गाचा धोका आहे. पुढील आठवडाभर त्याला जास्तीत जास्त विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. आठवडाभर कमीत कमी हाचलाल कर, असं आम्ही सैफला सुचवलं आहे. त्याच्या मणक्यालाही दुखापत झाली होती. आम्ही त्यावर शस्त्रक्रिया केली असून त्याची प्रकृती आता उत्तम आहे”.
एक संशयित ताब्यात
सैफच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हल्लेखोराचा घरात जाताना किंवा तिथून पळून जातानाचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. मात्र इमारतीच्या पायऱ्यांजवळील एका कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला आहे. या व्हिडीओच्या मदतीने पोलीस हल्लेखोराचा तपास करत असतानाच आता पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी चालू आहे.