यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट, वेबमालिकांची ‘नेटफ्लिक्स’कडून घोषणा

मुंबई : लोकप्रिय कलाकारांपासून नवोदित कलाकारांच्या अभिनयाने आणि सर्जनशील कथांनी सजलेले चित्रपट २०२५ या वर्षात ‘नेटफ्लिक्स’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जवळपास सहा चित्रपट, १२ वेबमालिका, एक लघुपट प्रदर्शित करण्यासह पाच कार्यक्रम या वर्षभरात सुरू होणार आहेत. या सर्व कलाकृतींची घोषणा ‘नेटफ्लिक्स’ने नुकतीच एका भव्य सोहळ्यात केली. या सोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह दिग्दर्शक व निर्मात्यांनी हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नेटफ्लिक्स’तर्फे सर्व कलाकृतींचे टीझर ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांची मुख्य भूमिका असलेला, विवेक सोनी दिग्दर्शित ‘आप जैसा कोई’, यामी गौतमी धर आणि प्रतीक गांधी अभिनीत, ऋषभ सेठ दिग्दर्शित ‘धूम धाम’, सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेला आणि कुकी गुलाटी व रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ – द हाईस्ट बिगिन्स’, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याचे पदार्पण असलेला शॉना गौतम दिग्दर्शित ‘नादानिया’ यात खुशी कपूर नायिकेच्या भूमिकेत आहे, आर. माधवन व नयनतारा यांची मुख्य भूमिका असलेला आणि एस. शशिकांत लिखित – दिग्दर्शित ‘टेस्ट’, राजकुमार राव व सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असलेला, विवेक दास चौधरी दिग्दर्शित ‘टोस्टर’ या चित्रपटांचा समावेश आहे.

भारतातील नेटफ्लिक्सच्या आशय विभागाच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी सांगितले की, ‘सर्जनशील कल्पनाशक्तीच्या सर्व सीमा ओलांडून दर्जेदार कथांच्या माध्यमातून २०२५ या वर्षांत प्रेक्षकांना जागतिक स्तरावरील वैविध्यपूर्ण मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. प्रेक्षकांच्या आवडत्या कथा आणि कलाकारांसह अॅक्शन, प्रेमकथा, थरार, रहस्य, हास्य, नाट्यमय आदी प्रकारांतील वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. भारतातील प्रसिद्ध कथाकथनकार, कलाकार आणि नवोदितांशी समन्वय साधून या कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. आमच्या ७०० दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांना सर्वोत्तम आशयघन कलाकृती आणि नेटफ्लिक्सवर पुढे काय? ही उत्सुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’

यंदा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबमालिकांमध्येही वैविध्य आहे. कीर्ती सुरेश, राधिका आपटे व तन्वी आझमी यांची धर्मराज शेट्टी लिखित – दिग्दर्शित ‘अक्का’, शबाना आझमी, गजराज राव, सई ताम्हणकर यांची हितेश भाटिया दिग्दर्शित ‘डब्बा कार्टेल’, शेफाली शाह, हुमा कुरेशी, रसिका दुगल अभिनीत, तनू चोप्रा दिग्दर्शित ‘दिल्ली क्राइम : सीझन ३’, दिव्येंदु, पुलकित सम्राट, सुविंदर विकी यांची करण अंशुमन व कनिष्क वर्मा दिग्दर्शित ‘ग्लोरी’, प्रोसेनजीत चॅटर्जी, सास्वता चॅटर्जी आदी कलाकारांच्या अभिनयाने सजलेली आणि देबमाता मंडल व तुषार कांती राय दिग्दर्शित ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’, बरुण सोबती व मोना सिंग अभिनीत, सुदीप शर्मा व फैसल रहमान दिग्दर्शित ‘कोहरा – सीझन २’, वाणी कपूर, वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला अभिनीत, गोपी पुथरन व मनन रावत दिग्दर्शित ‘मंडाला मर्डर्स’, राणा दग्गुबाती, व्यंकटेश दग्गुबाती, अर्जुन रामपाल अभिनीत करण अंशुमन, सुपर्ण वर्मा व अभय चोप्रा दिग्दर्शित ‘राणा नायडू : सीझन २’, प्रतीक गांधी, सनी हिंदुजा अभिनीत, सुमित पुरोहित दिग्दर्शित ‘सारे जहाँ से अच्छा’, संदीप किशन, मिथिला पालकर यांची मल्लिक राम दिग्दर्शित ‘सुपर सुब्बू’ या वेबमालिकांबरोबरच शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेली ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेबमालिकाही याचवर्षी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. याशिवाय, भूमी पेडणेकर, इशान खट्टर, साक्षी तन्वर अभिनीत, प्रियांका घोष व नूपुर अस्थाना दिग्दर्शित ‘द रॉयल्स’ ही वेबमालिकाही नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

चित्रपटांसह लघुपट, कथाबाह्य कार्यक्रमांची रेलचेल

यंदा ‘नेटफ्लिक्स’वर चित्रपटांबरोबरच वैविध्यपूर्ण लघुपटांची पर्वणीही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अनन्या शानबाग (पलक), सजदा पठाण (अनुजा), नागेश भोसले (मिस्टर वर्मा) यांची मुख्य भूमिका असलेला आणि अॅडम जे. ग्रेव्हज लिखित – दिग्दर्शित ‘अहुजा’ हा लघुपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘डायनिंग विथ द कपूर्स’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो : सीझन ३’, ‘द ग्रेटेस्ट रायव्हलरी – भारत विरुद्ध पाकिस्तान’, ‘वीर दास फुल वॉल्यूम’ हे कथाबाह्य कार्यक्रम या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. ‘द रोशन्स’ हा माहितीपट १७ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ या कार्यक्रमाचे आठवड्याला थेट प्रक्षेपण (लाइव्ह) होणार आहे.