मित्र म्हणून गप्पा मारणं, खेळणं, मजामस्ती करणं ठीक आहे. पण, मित्र कितीही जवळचा असला तरी आपली बुध्दी न वापरता त्याच्या आग्रहाखातर वाहवत जाणं किती धोकादायक असतं याचा अनुभव सैफ अली खानने ‘हमशकल’च्या निमित्ताने घेतला. या चित्रपटाने कमाई केली तरी तो टुकारच होता, याची जाहीर कबूली सैफला द्यावी लागली. दिग्दर्शक साजिद खानच्या नादात आपणही नको ते वेडेचाळे चित्रपटातून केले, याची त्याला खंतही वाटली आणि त्याने साजिदवर जाहीर टीका करत त्याच्याशी ‘कट्टी’ घेतली होती. मात्र, व्यावसायिक संबंध एकीकडे पण, मैत्रीचे काय? साजिदच्या मैत्रीने सैफच्या ‘कट्टी’वर मात केली आणि आता दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत.
‘हाऊसफुल्ल’ चित्रपट मालिकांच्या यशानंतर दिग्दर्शक म्हणून साजिद खानचा लौकिक वाढला होता. मात्र, ‘हिम्मतवाला’सारखा वाईट चित्रपट देऊन त्याने पहिल्यांदा अजय देवगणला तोंडघशी पाडले. तर त्याचा ‘हमशकल्स’ सारखा निर्बुध्द चित्रपट करून सैफ अली खानचे हसे झाले.  आजवर अनेक बऱ्या-वाईट चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेल्या अजयने समंजसपणा दाखवत या गोष्टीसाठी मी एकटय़ा साजिदला जबाबदार धरू शकत नाही, असे अजयने सांगितले. सैफला मात्र आपल्याच मित्रामुळे आपले हसे झाले ही भावना दुखवून गेली. त्याने जाहीर कार्यक्रमांमधून साजिदवर टीका केली. ‘हमशकल्स’ सारखा चित्रपट करण्याची चूक आपण पुन्हा करणार नाही, असे सांगणाऱ्या सैफने साजिदशी बोलणेही टाळले होते.
पण, मित्रावाचून करमेना.. अशी सैफची अवस्था झाली. सैफ आणि साजिद खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांना विनोद करायला, गप्पा मारायला, पत्ते खेळायला खूप आवडते. आता मित्रावरच फुली मारल्यामुळे या सगळ्या गोष्टींना सैफ दुरावला होता. तर साजिदलाही मनापासून वाईट होते. शेवटी व्यावसायिक संबंधांवर मैत्रीने मात केली. साजिदची आठवण आल्यावर सैफ सरळ उठला. त्याने साजिदचे घर गाठले. दोघांनी गळाभेट घेऊन मागच्या सगळ्या गोष्टी संपवल्या. आता ही जोडगोळी वास्तव आयुष्यात तरी पुन्हा एकत्र आली आहे. पण, रुपेरी पडद्यावर एकत्र येण्याचा धोका सैफ पत्करणार का?, हे अजून तरी समजलेले नाही.

Story img Loader