‘बुलेट राजा’ चित्रपटातील आपल्या सहकलाकारांबरोबर सैफ अली खान आज (बुधवार) कार्यक्रमाच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेपेक्षा जवळजवळ तीन तास उशिरा आल्याने माध्यमांचे प्रतिनिधी त्याच्यावर चांगलेच भडकले.
दिल्ली निवडणूक आयोगाने आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘नवाब’साहेबांचे आगमन होताच चिडलेले वार्ताहर आणि छायाचित्रकारांनी सैफला उशिरा येण्याबद्दल माफी मागण्यास सांगितले. माध्यमांच्या प्रतिनिधींची ही विनंती सैफने फेटाळून लावली.
मी माफी मागणार नाही, यात माझी काहीही चूक नाही… मी वाहतुकीच्या कोंडीत अडकलो होतो. या परिस्थितीसाठी मी जबाबदार नसून, चित्रपट कलाकारांनी दिल्लीत येऊ नये असे वाटत असल्याचे सैफ म्हणाला. दिल्लीतील ही माझी शेवटची भेट असून, यापुढे मी मुंबईतून माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधेन असे देखील तो म्हणाला.
लोकांना एवढा वेळ ताटकळत ठेवल्याने; सैफच्या माफीची गर्दीतील एकाने मागाणी करताच सैफ म्हणाला, जर का कोणी माफी मागायचीच असेल, तर ती निवडणूक अधिकाऱ्यांनी मागायला हवी, कारण त्यांनी योग्य वेळ कळवली नव्हती.
सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगील आणि दिग्दर्शक तिग्मान्शु धूलियाबरोबर आलेल्या सैफने नियोजीत वार्तापरिषद रद्द केली.
या प्रकारानंतर उत्तर विभागाचे जिल्हा निवडणूक अधिकारी ए. एम. मोरे वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हणाले, सैफने माफी मागितली. त्याला येण्यास उशीर झाल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही देखील माफी मागितली. आम्ही एका सामाजीक कारणासाठी एकत्र आल्याचे माध्यामांनी देखील समजून घेण्याचे गरजेचे होते.
ते पुढे म्हणाले, चित्रपट कलाकारांना अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहावे लागते. नक्कीच त्याला इतर महत्वाच्या कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावायची असणार. मतदारांनी मोठ्याप्रमाणावर मतदानात सामील होण्याचा संदेश देण्यासाठी तो आला होता.
नंतर, कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडतांना सैफने काही जणांची माफी मागितल्याचे समजते.

Story img Loader