अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या अभिनंदनाचे दूरध्वनी चुकीने सुभाष देसाईंना
‘हॅलो, रिंकू.. तुझा सैराट बघितला. भारी पिक्चर!.. तू तर कमालच केलीस.. नागराज मंजुळेला सलाम आणि तुझं अभिनंदन!’.. फोनवर पलीकडून बोलणारा माणूस थांबतच नव्हता. नागराज मंजुळेच्या सैराटनं आणि त्यातील रिंकू राजगुरूच्या अभिनयानं तमाम महाराष्ट्राला ‘याड लावल्यानं’, हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाचीच हीच अवस्था होणार हे ठरलेलंच असलं, तरी रिंकूचं अभिनंदन करण्यासाठी आपण जो नंबर फिरवलाय, तो रिंकूचाच आहे किंवा नाही याची खात्री करण्याची उसंतही प्रेक्षकांना राहिली नाही. म्हणूनच, आपण रिंकू राजगुरूशी नव्हे, तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी भडाभडा बोलून गेलो, हे लक्षात आल्यावर अनेकांची निराशाच होत गेली, आणि खणखणणारा प्रत्येक फोन घेऊन, ‘अहो मी रिंकू राजगुरू नाही, राज्याचा उद्योगमंत्री आहे,’ असे सांगत स्पष्टीकरण देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई दिवसभर अक्षरश: हैराण झाले.. ही गंमत कशी झाली त्याचा उलगडा नंतर झाला. ‘सैराट’ चित्रपटात ‘आर्ची’ची भूमिका करणाऱ्या रिंकूच्या राजगुरूवर समाजमाध्यमातून तसेच आंतरजालावरील तिच्या पानावर अभिनंदनाचा अक्षरश: पाऊस पडतोय. पण अचानक तिच्या अभिनंदनाचे सारे फोन सुभाष देसाई यांच्या नंबरवर खणखणू लागले. अगोदर एक-दोन फोन घेतल्यानंतर, ‘राँग नंबर’ लागत असावेत असे देसाईंना वाटले, पण नंतर मात्र, सतत फोन वाजतच राहिले. रिंकूच्या अभिनंदनाचा हसतमुखाने स्वीकार करत ‘आपण रिंकू नाही’ असे नम्रपणे सांगणाऱ्या देसाई यांच्या कामकाजात मात्र नंतर फोनच्या या वाढत्या खणखणाटामुळे आणि प्रत्येक फोनला उत्तर देण्यामुळे व्यत्यय सुरू झाला, तरी रिंकूच्या अभिनयास रसिकांनी दिलेल्या प्रत्येक पावतीचे आपण दिवसभर साक्षीदार ठरलो, या जाणिवेने देसाई काहीसे सुखावतही होते..
‘रिंकूच्या वेबपेजवर कुणी तरी चुकून माझा नंबर टाकला असावा व त्यामुळे ही गल्लत झाली असावी,’ असे सांगत देसाई यांनी हा सारा प्रकार हलकेफुलके घेतला. पण नंतर मात्र, काही वेळ त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला. पुन्हा फोन चालू केल्यावर पुन्हा रिंकूच्या अभिनंदनाचे फोन सुरू झाले. एसएमएसची घंटा तर क्षणाक्षणाला वाजतच होती. रिंकूच्या अभिनंदनाचे शेकडो एसएमएस सुभाष देसाई यांच्या फोनवर आल्याने आजचा दिवस अक्षरश: ‘सैराट’ झाला..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा