नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट तिकीटबारीवर वेगाने कमाईचे नवनवे विक्रम करतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत ‘सैराट’ या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. दोन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत ५० कोटींच्यावर कमाई करण्याचा पहिला मान ‘सैराट’ला मिळालायं.
आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. ‘सैराट’ ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ चित्रपटाने तीन आठवडय़ांत ४० कोटींची कमाई केली होती. ‘सैराट’ने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरले आहे.
यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ २२ कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या १० दिवसांतच पार करून नवा विक्रम केला आहे. ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यात २५.५० कोटींचा टप्पा पार केला होता. दुसऱ्या आठवड्यात सैराटची कमाई २६.५० कोटी इतकी झाली आहे. ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी ३.५५ कोटी, शनिवारी ३.८० कोटी आणि रविवारी ४.८५ कोटी आणि सोमवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई १५.१० कोटी रुपयांवर गेली.

Story img Loader