आर्ची आणि परश्याच्या प्रेमानं सैराट झालेलं मन एकीकडे तर दुसरीकडे चित्रपट संपताना सुन्न करणाऱ्या शांततेत रक्ताने माखलेली चिमुकली पावले कित्येक प्रेक्षकांच्या मनात आवाज न करता शिरली. त्यामुळेच सेलिब्रिटी कलाकारांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाने ‘सैराट’ पाहिल्यानंतरची अस्वस्थता या ना त्या माध्यमातून मोकळी केली आहे. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या प्रकारे पहिली नोकरी, पहिलं घर, पहिला मोबाईल हे सर्वांसाठीच फार खास असतं त्याचप्रकारे एका कलाकारासाठी त्याचा पहिला चित्रपटसुद्धा तितकाच खास असतो. त्यातही जर पहिल्याच चित्रपटात कलाकाराला ओंजळीतही न मावणारं असं भरभरून यश मिळालं तर.. राष्ट्रीय पुरस्काराने तिच्या अभिनयाचा गौरव करण्यात आला. ‘इंग्लिशमध्ये सांगू काय..’ या आर्चीच्या डायलॉगने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या रिंकू राजगुरूच्या प्रेमात सगळेच पडले. अवघ्या तेराव्या वर्षापासून तिचा हा प्रवास सुरू झाला. आजही ऑडिशनचा तो दिवस स्पष्ट आठवत असल्याचं ती सांगते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी एकदम कावरीबावरी होते, काहीच कळत नव्हतं. सरळ गेले आणि तिथे जाऊन विचारलं की नागराज मंजुळे कुठे आहेत? माझ्या शेजारीच एक दाढीवाला माणूस उभा होता. तो माझ्याकडे बघत होता. नंतर तोच म्हणाला की ऑडिशन देते का? मी त्याला विचारलं हे ऑडिशन काय असतं? तेव्हा मला समजलं की तेच नागराज मंजुळे आहेत”; आजही तितक्याच निरागस भावनेने तिने पहिल्या भेटीला किस्सा सांगितला. त्याआधी रिंकून वर्तमानपत्रात त्यांचं नाव वाचलं होतं. तो माणूस आहे तरी कोण, अशी उत्सुकताही तिला होती. योगायोगाने तिने ऑडिशनमध्ये देवा श्रीगणेशा या अजय-अतुलच्या गाण्यावर डान्स करून दाखवला. नंतर तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी हीच लोकप्रिय जोडगोळी संगीत देणार असल्याची पुसटशीही कल्पना तिला तेव्हा नव्हती.

ती पुढे म्हणते, “ऑडिशन देताना मी १३ वर्षांचे होते. ती गोष्ट कधीही न विसरता येणारी आहे. त्याच्यामुळेच मी आज इथे आहे व तू माझी मुलाखत घेत आहेस. त्यावेळी मी चित्रपट, अभिनय या गोष्टींकडे इतक्या गंभीरपणे पाहिलंसुद्धा नव्हतं. पण ते करताना मला फार मजा येत होती. लोकांनी अजूनही आर्ची-परश्याला त्यांच्या मनात जिवंत ठेवलंय, हे पाहून खूप चांगलं वाटतं. सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या जुळून आल्या. म्हणूनच सैराट घडला.” आजही सैराटची टीम एकमेकांच्या संपर्कात असल्याचं ती सांगते. प्रत्येकाच्या वेळापत्रकामुळे सगळ्यांना एकत्र भेटणं जमत नाही, पण जेव्हा पुण्यात सगळे असतात, तेव्हा आम्ही नक्की भेटतो.

रिंकूमधला अभिनयाचा किडा नागराज मंजुळेंनी अचूकपणे हेरला होता. म्हणूनच त्यांनी नवोदित कलाकारांना यात पूर्ण विश्वासाने संधी दिली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी रिंकूला सांगितलं होतं की तुला राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळेल. तेव्हा रिंकूला त्यावर विश्वासच बसत नव्हता. ‘हे उगाच आपली मस्करी करत आहेत’, असं तिला वाटलं. पण जेव्हा टीव्हीवर पुरस्कारासाठी नाव जाहीर झालं तेव्हा ती ढसाढसा रडू लागली होती. “राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणार होते तेव्हा नागराज मंजुळे खूप आतुरतेने टीव्हीसमोर जाऊन बसले होते. त्यांनी खूप आधीच मला सांगितलं होतं की तुला हा पुरस्कार मिळेल. जेव्हा घोषणा झाली तेव्हा मात्र माझ्या अश्रूंना आवरणं कठीण होतं”; अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

आता बाहेर फिरणं, मोकळेपणाने बागडणं हे सर्व ती करू शकत नाही. पण इतक्या कमी वयात इतकं स्टारडमपण कोणाला सहजासहजी मिळत नाही याचाही तिला अभिमान आहे. “मी या गोष्टींचा आनंद घेतेय. जे माझ्या वाट्याला आलंय, ते प्रत्येकाला अनुभवायला मिळत नाही”, असं ती सांगते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame archi aka rinku rajguru rewind the memories of marathi blockbuster ssv