‘सैराट’ चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली. चार वर्षांनंतरही प्रेक्षकांना या चित्रपटाने लावलेलं याडं किंचितही कमी झालेलं नाही. प्रेक्षकांना हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यासारखे वाटते. चित्रपटातील आर्चीची मैत्रीण आनी अर्थात अनुजा मुळ्ये ही देखील याला अपवाद नाही. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आनीने ‘सैराट’च्या आठवणींना उजाळा दिला. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची (रिंकू राजगुरु) आणि परश्या (आकाश ठोसर) यांनी ज्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर केले, अगदी त्याच प्रमाणे आनीच्या अभिनयालाही (अनुजा मुळ्ये) प्रेक्षकांनी दाद दिली.

आनी अर्थात अनुजा मुळये ही मुळची पुण्याची. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात वाढलेल्या अनुजाला रंगमंचाची चांगलीच ओढ. त्यामुळेच ती कायद्याचे शिक्षण घेत मिळेल तेव्हा रंगमंचावरुन आपल्यातील अभिनयाचा बाज दाखवून देते. अनुजाने महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ तसेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धा गाजविल्या आहेत. ‘सैराट’ चित्रपटातील तिची निवडही रंगमंचावरुनच झाली. ‘लोकसत्ता’ने आयोजित ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे आले होते. त्यावेळी एका एकांकिकेमध्ये अनुजा मुळ्येही भूमिका साकारत होती. त्याचवेळी नागराज यांनी तिला हेरले आणि ती आर्चीची मैत्रीण झाली.

‘सैराट’ने कलाकारांना एक ओळख दिली यात नवं नाही. पण या चित्रपटाने प्रेक्षकांना जसा आनंद दिला, अगदी त्याचप्रमाणे कलाकारांनाही अविस्मरणीय अनुभव दिला. या चित्रपटाचा अनुभव सांगताना अनुजा म्हणाली, “या चित्रपटामुळे ग्रामीण जीवन जगण्याची संधी मला मिळाली. शेतातील चित्रीकरण, ट्रॅक्टरवर बसण्याची पहिलीच वेळ, घोड्यावरील सैर आणि विहिरीत पोहण्याचा किस्सा अविस्मरणीय असा आहे. चित्रपटाच्या निमित्ताने गावाकडे केलेली भटकंती ही चौपाटीवरच्या भटकंतीपेक्षा खूपच भन्नाट होती.”

आणखी वाचा : अन् त्याने विचारलं ऑडिशन देते का?…असा सुरू झाला ‘सैराट’मधील आर्चीचा प्रवास

प्रेक्षक म्हणून ‘सैराट’ चित्रपटातील आवडता सीन सांगताना पहिल्या भागातील कथानक अधिक आवडल्याचे अनुजाने म्हणते. चित्रपटातील पहिला भाग प्रेमकथेमुळे नव्हे, तर नायिकेच्या निर्भीडपणामुळे आवडल्याचे सांगायला अनुजा विसरत नाही. आर्चीच्या व्यक्तिरेखेविषयीचा दाखला देताना अनुजा म्हणाली की, “सर्वच मुलींमध्ये आर्ची असते, पण त्या आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करायला घाबरतात. त्यामुळे चित्रपटातील आर्चीभोवती गुंफलेले प्रत्येक धाडसीदृश्य आकर्षित करणारेच आहे.”

आणखी वाचा : सैराटच्या ‘प्रिन्स’ला शिव्या पडतात तेव्हा…

‘सैराट’ च्या यशानंतर अनुजालाही अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. मात्र, कायद्याचा अभ्यास अधिक फायद्याचा असल्याचे जाणून ती पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करते आहे.