प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट घराघरात लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. मात्र अजून या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबतच प्रिन्स ही भूमिकाही गाजली. या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सूरज पवार हा अडचणीत सापडला आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीला फसवल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगत शिर्डीतील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सूरजने नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे.
आणखी वाचा : “…त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला”, ‘सैराट’मधील सल्याच्या पोस्टमुळे चर्चेत आलेल्या रिक्षाचालकाचे स्पष्टीकरण
नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दोन जणांनी दिलं होतं. यासाठी त्यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले असता त्यांना आपली फसवणूक होत असल्याची समजले. त्यानंतर त्यांनी रितसर अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशा तीन जणाांना अटक करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणात सैराट फेम अभिनेता सूरज पवार याचाही सहभाग असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लवकरच राहुरीच्या पोलिसांकडून लवकरच प्रसिद्ध सिनेमा सैराटमधील प्रिन्स (सूरज पवार) च्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर याला काही दिवसांपूर्वी मंत्रालयातून बोलत असल्याचा एक फोन कॉल आला होता. त्यावेळी आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या असं फोनवरील व्यक्तीने सांगितले.
आणखी वाचा : “माझी सैराटसाठी निवड झाली नाही, पण अचानक नागराज सरांचा…”; ‘झुंड’मधील ‘भावना भाभी’ने सांगितला किस्सा
बेरोजगार असल्यानं वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. यानंतर ठरल्याप्रमाणे ४ सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला. पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीला दोन लाख रुपये दिले. यानंतर दोन दिवसांनी तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. ठरल्याप्रमाणे ९ सप्टेंबरला त्या सर्वांची भेट झाली. मात्र वाघडकर याना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता श्रीरंग कुलकर्णी नावाचा कोणीही व्यक्ती मंत्रालयात काम करत नाही अशी माहिती त्यांना समजली. तसेच तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षीरसागर हा आहे, असेही त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याचा तपास सुरु केला. यानंतर आकाश विष्णू शिंदे याचे नाव पुढे आले आणि पोलिसांनी ओमकार नंदकुमार तरटे या तरुणाच्या दुकानावर छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.