पहिल्याच चित्रपटात लक्षवेधी अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट कसा बरे असणार, त्यात ती कोणत्या रूपात दिसणार, हा कायमच कुतुहलाचा विषय. ‘सैराट’ची आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने स्वतःच्या मेहनतीने व अष्टपैलू अभिनयाने रसिकांचे भरभरून प्रेम मिळवल्याने तर तिच्या पुढच्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. रिंकूचा दुसरा चित्रपट कोणता हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. रवि जाधवच्या ‘बेंजो’ या आगामी हिंदी चित्रपटात ती दिसणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. या निमित्ताने काही यशस्वी अभिनेत्रींच्या दुसऱ्या चित्रपटावर टाकलेली एक नजर…
‘बॉबी गर्ल’ डिंपल कापाडियानेही आपल्या पहिल्याच चित्रपटात सौंदर्य आणि धाडसी अभिनय या गुणांवर प्रचंड लोकप्रियता संपादली. पण १९७३ च्या २८ सप्टेंबर रोजी ‘बॉबी’ झळकण्यापूर्वीच १९७२ च्या डिसेंबरच्या अखेरीला राजेश खन्नाची पत्नी बनून ती ‘आशीर्वाद’ बंगल्यात गेली. अफाट गुणवत्ता असणारी अभिनेत्री अशी एकाच चित्रपटातून पडद्याआड जातेय म्हणून रसिक हळहळले. दोन कन्याना जन्म दिल्यावर राजेश व डिंपलमधे सुरू झालेली वादावादी गाँसिप्स पत्रकाराना खमंग खाद्य ठरले. डिंपल दोन्ही मुलींसोबत ‘आशीर्वाद’मधून बाहेर पडली व पित्याच्या जुहूच्या ‘समुद्र महल’मध्ये राहू लागली. १९८५ ला रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ या चित्रपटापासून डिंपलने पुनरागमन केले. म्हणजे तिचा दुसरा चित्रपट बारा वर्षांच्या अंतराने आला. रसिकांची एक पिढी मागे सरूनही डिंपलचे आकर्षण कायम राहिले हे विशेष.
श्रीदेवीचा पहिला चित्रपट कोणता माहितीये? ‘जुली’मध्ये ती लक्ष्मीची लहान बहीण होती. १९८० चा भारती राजा दिग्दर्शित ‘सोलवा साल’ तिचा पहिला चित्रपट. त्यात अमोल पालेकर तिचा नायक होता. रसिकांनी हा चित्रपट नाकारला. त्यानंतर १९८३ चा ‘हिम्मतवाला’ हा तिचा दुसराच चित्रपट खणखणीत यशस्वी ठरला. त्यात ती जितेन्द्रला भारी ठरली.
रेशम टिपणीसचा पहिला आणि दुसरा चित्रपट चक्क लागोपाठच्या आठवड्यात झळकले. १९९२ ची ही गोष्ट. महेश कोठारेने ‘जिवलगा’ या चित्रपटातून रेशमला रूपेरी पदार्पणाची संधी दिली. तेव्हाच प्रकाश भेंडेने ‘आपण याना पाहिलेत का’ या चित्रपटातूनही रेशमला संधी दिली. योगायोग असा की रेशमचा पहिला व दुसरा चित्रपट चक्क लागोपाठच्या आठवड्यात झळकला. अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट या प्रकारातील ही काही महत्वाची उदाहरणे होत. रिना रॉयची तर गंमतच झाली. तिचा पहिला चित्रपट ‘नयी दुनिया नये लोग’ निर्मितीवस्थेत असा रखडला की तोपर्यंत ‘जरूरत’ हा तिचा दुसरा चित्रपट तयार होऊन झळकलादेखिल. ‘नयी दुनिया…’ मग डब्यातच गेला. अभिनेत्रींचा दुसरा चित्रपट रंगतदार प्रकार आहे ना…
सिनेमा विशेष : रिंकू राजगुरुच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने…
रिंकूचा दुसरा चित्रपट कोणता हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame rinku rajguru second movie