तरुणाईसह राज्यातील बच्चेकंपनीला आणि आजी-आजोबांनाही झिंग झिंग झिंगाट करायला लावणारा ‘सैराट’ तिकीटबारीवरही सुस्साट सुटला आहे. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून न भूतो न भविष्यती अशी कमाई सुरू झाली. ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड हा मराठी चित्रपटालाही लागू शकतो हे ‘सैराट’ने सिध्द केले.  या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत ४१ कोटींचा गल्ला जमवून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.
यापूर्वी , १ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाने तीन आठवड्यांत ३५.१० कोटींचा गल्ला जमविला होता. पण, सैराटने केवळ ११ दिवसांतचं हा रेकॉर्ड मोडत ४१ कोटींची विक्रमी कमाई केलीय. अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणूसही आज ‘सैराट’ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहे. ‘सैराट’ला पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन् या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सध्या लोकांवर सैराटची एवढी झिंग चढली आहे, की ते चित्रपटगृहामध्ये पुन:पुन्हा हा चित्रपट पाहायला जात आहेत. ‘सैराट’ची पायरेटेड कॉपी मोबाईल, कॉम्प्युटरवर आली आहे. मात्र, पायरसीचाही प्रेक्षकांवर परिणाम झालेला नाही. करमाळा परिसरातील नयनरम्य दृश्ये, आर्ची-परशाचा बेधुंद डान्स आणि संवेदनशीलता अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडेच वळत आहेत. अजूनही ‘सैराट’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची तिकिट खिडकीवर झिंगाट गर्दी पाहावयास मिळत आहे.  जाणकारांच्या मते हा चित्रपट ५० कोटींहून अधिक कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात १२ कोटी १० लाखांची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच ३.५५ कोटींचा श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर शनिवारी ३.७० आणि रविवारी ४.८५ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला होता. ‘सैराट’ पहिल्या आठवडय़ात ४०० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला. आठवडय़ाला ९ हजार शो दाखवण्यात येत होते. आता ४५६ चित्रपटगृहांमधून आठवडय़ाला १३ हजार शो दाखवले जात असून, तरीही हाऊसफुल्लची पाटी कायम आहे. ‘सैराट’ मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात प्रदर्शित होणा-या ‘चीटर’ आणि पैसा पैसा’ या चित्रपटांची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्याचसोबत प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला ‘३५ टक्के काठावर पास’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा