गेल्या काही दिवसांपासून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ #SairatMania या हॅशटॅग अंतर्गत विविध रंजक बातम्या तुम्हाला देतो आहे. यामध्ये आतापर्यंत आपण सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. इतकेच काय आर्चीच्या मामे भावाची भूमिका साकारणारा मंग्या म्हणजेच धनंजय ननावरेबद्दलही आपण जाणून घेतलं. सैराट’मध्ये आर्ची आणि परशा यांच्यासह लक्ष वेधून घेणारे पात्र म्हणजे लंगड्या आणि सल्या… तानाजीने लंगड्याची तर अरबाज शेख नावाच्या तरुणाने सल्याची भूमिका साकारली होती. अरबाजने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोख बजावली. मात्र या चित्रपटासाठी अरबाजची निवड काही सहजासहजी झालेली नाही. एका प्रसंगामुळे अरबाजवर चक्क रडण्याची वेळ आली होती.
वाचा : #SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’
अरबाज शेख हा नागराज मंजुळे यांच्या जेऊर येथील घराशेजारीच राहतो. अरबाजला थोडीफार अभिनयाची आवड होती. त्यामुळे तो सतत चित्रपटात काम मिळावं म्हणून नागराज यांच्या मागे लागायचा. त्यावर, हो तुला मी काम देईन, असाच नागराज यांचा सूर होता. मात्र, त्याला काम काही मिळत नव्हतं. अखेर एकदा त्याने नागराज यांचा भाऊ भूषण मंजुळे यांच्याकडे ऑडिशन दिले. त्याचा व्हिडिओ भूषण यांनी नागराजला पाठवला. पण, नागराजला पहिल्यांदा अरबाजचा अभिनय काही पसंत पडला नाही आणि त्यांनी त्याला रिजेक्ट केलं. यामुळे अरबाज बराच नाराज झाला होता. संपूर्ण रात्र त्याने रडून काढली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने ऑडिशन दिली. यावेळी मात्र त्याचं सल्याच्या भूमिकेसाठी कास्टिंग झालं. सहसा नकार मिळाल्यावर माणसं खचून जातात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण, अरबाजने असं न करता उलट दुसऱ्या दिवशी त्याच चिकाटीने पुन्हा एकदा ऑडिशन दिली आणि ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणजे काय याचा परिचय सर्वांना करुन दिला.
वाचा : #SairatMania : …म्हणून ‘सैराट’ आवडला नाही
आपल्या मित्राला प्रेम मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा सल्या अनेकांना भावला. काहींनी स्वतःलाच सल्यामध्ये पाहिलं. मात्र, चित्रपटाला मिळालेल्या लोकप्रियतेने हुरळून न जाता अरबाज आता नेहमीच्या आयुष्यात पुन्हा रुळला आहे. किंबहुना तो आता नव्याने भविष्याच्या तयारीला लागला आहे.
वाचा : #SairatMania : ‘आर्ची प्रत्येक मुलीमध्येच असते, पण ती बिनधास्तपणे व्यक्त व्हायला घाबरते’
आर्ट्सचा विद्यार्थी असलेल्या अरबाजने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे चित्रपटात काम करण्याचा अरबाज फारसा विचार करत नाहीये. दरम्यान, सैराटच्या प्रदर्शनानंतर अरबाजचं बाहेर फिरणं खूप कमी झालंय. एकदा तो त्याच्या मामाच्या गावी गेला होता. कोणी पाहू नये म्हणून त्याने चक्क तोंडाला रुमाल बांधला होता. तरीही गावातल्या काही मुलांनी त्याला ओळखलं आणि घराबाहेर संपूर्ण गाव त्याला भेटण्यासाठी जमा झालं होतं. अरबाजकडे एक चित्रपट आला असून त्याचं वाचन सध्या सुरु आहे. तरीही चित्रपटांवर अवलंबून न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय अरबाजने घेतला आहे. पुढे आपल्याला चित्रपट मिळतील किंवा मिळणार नाहीत, त्यामुळे असं काही काम करायचं जेणेकरून माझ्या कुटुंबाच्या गरजा मी पूर्ण करू शकेन, असं अरबाजनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.
वाचा : #SairatMania : सहजच आलास अन् ‘सैराट’ झालास…
#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com या ईमेल आयडीवर….
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com