संपूर्ण महाराष्ट्राला ‘झिंगाट’ करून सोडलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १२.१० कोटींचा गल्ला जमवून याआधीचे सर्व रेकोर्ड मोडीत काढले आहेत. प्रेक्षक दिग्दर्शक नागराज मंजुळे, परशा आणि आर्चीचे भरभरून कौतुक करत आहेत, तर अजय-अतुलच्या गाण्यांवर भर चित्रपटगृहातच थिरकताना दिसत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सैराटने पहिल्या विकेण्डमध्ये म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांच्या कमाईत याआधीच्या सर्व मराठी चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘सैराट’ने तीन दिवसांत १२.१० कोटींची कमाई करून नाना पाटेकर यांच्या ‘नटसम्राट’ला मागे टाकले आहे. ‘नटसम्राट’ने पहिल्या विकेण्डमध्ये १० कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि आकडेवारी पाहता ‘सैराट’ येत्या आठवड्याभरात सर्व विक्रम मोडीत काढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
‘नटसम्राट’ने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात ‘नटसम्राट’ची कमाई २२ कोटीच्या पार गेली होती. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता.

Story img Loader