दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची विक्रमाच्या दिशेचे घोडदौड सुरूच असून, पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने २५ कोटींचा टप्पा गाठला आहे. ताज्या आकडेवारीनुसार ‘सैराट’ने आठवड्याभरात २५ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला आहे. एखाद्या मराठी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २५ कोटींची कमाई केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘सैराट’ची ही घोडदौड पाहता हिंदी चित्रपटाच्या स्पर्धेत मराठी चित्रपटांची तितकी कमाई होत नाही, हा समज आता मोडीत निघाला आहे. साऱया महाराष्ट्राला ‘याड लावलेल्या’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात १२ कोटी १० लाखांची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच ३.५५ कोटींचा श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर शनिवारी ३.७० आणि रविवारी ४.८५ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला होता.
यापूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नटसम्राट’ चित्रपटाने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाखांची कमाई केली होती, तर ९ दिवसात ‘नटसम्राट’च्या कमाईचा आकडा २२ कोटींच्या वर गेला होता.