दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा ‘सैराट’ हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरत असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या या चित्रपटासंदर्भातील वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘सैराट’ हा चित्रपट मराठा समाजाची लायकी काढणारा आणि अपमान करणारा चित्रपट असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी सोलापुरात आयोजिलेल्या एल्गार मेळाव्यासाठी आमदार राणे आले होते. यावेळी नितेश यांनी ‘सैराट’मध्ये मराठा समाजाच्या करण्यात आलेल्या चित्रणावर आक्षेप घेतला. मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट ८० कोटी कमावतो. अशाचप्रकारे अन्य समाजाचे किंवा ब्राह्मण समाजाचे चित्रण करण्यात आले असते तर संबंधितांना महाराष्ट्रात फिरून दिले असते, का असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाई नाचल्याचे दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मग मराठा समाज का शांत राहतो असे चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले.
यावेळी नितेश यांनी ठाकरे घराण्यालाही लक्ष्य केले. मराठा आरक्षणाला ठाकरे घराण्याचा विरोध आहे. परंतु त्यासाठी ठाकरे घराण्याला अंगावर घेण्याची आक्रमकता आपण ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. आपले वडील नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले होते. परंतु आता फडणवीस सरकारने हे आरक्षण हिसकावून घेतले आहे. यात सरकारची मराठा समाजाविषयी विद्वेषाची भावना दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा