मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवणारा, लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठणारा आणि यशाचे नवनवे विक्रम रचणारा, केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांना वेडं करणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. या चित्रपटातील आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने सर्वांनाच भुरळ घातली तर यातील गाण्यांची सर्वांनाच धुंदी चढली. नागराज मंजुळे यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि झी स्टुडिओजची उच्चत्तम निर्मितीमूल्ये या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांना मनापासून भावला. या चित्रपटाने आपल्या लोकप्रियतेची पताका साता समुद्रापार फडकवली. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या दिग्दर्शक कलाकार मंडळींना या चित्रपटाने आपल्या प्रेमात पाडलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीसाठी यशाचं एक दारच नाही तर एक भव्य दालन उघडून दिलं. आज मराठी चित्रपट म्हणजे ‘सैराट’ आणि यश म्हणजे ‘सैराट’ असं नवं समीकरण तयार झालं. मोठ्या पडद्यावरुन मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय छोट्या पडद्यावरून. सैराटचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमियर होणार असून या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष सर्वार्थाने सैराटमय ठरलंय. चित्रपट प्रदर्शित होऊन एवढे दिवस झाले असले तरी अजूनही विविध निमित्ताने हा चित्रपट चर्चेचा विषय ठरतोय. सैराट हा ख-या अर्थाने मैलाचा दगड ठरलाय. मुख्य कलाकार एकदम नवीन तेही ज्यांचा कॅमेराशी कधीच संबंध आला नाही असेच. सहाय्यक कलाकारांनाही कामाचा जेमतेम अनुभव. परंतु हे नवखेपणच या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. रोजच्या जगण्या वागण्यातली ही पात्रे प्रेक्षकांना स्वतःच्या जवळची वाटली.. याची गोष्ट, त्यातील सरळ साधे संवाद मनाला भिडले आणि आर्ची-परश्याच्या या प्रेमकथेने अनेकांच्या काळजाला हात घातला. यामुळेच या चित्रपटाला भरभरून यश मिळालं.
मोठ्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळवल्यानंतर हा चित्रपट छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही चित्रपट असे असतात ज्यांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद हा काही औरच असतो. म्हणजे हे चित्रपट कितीही वेळा बघितले तरी त्यातली गंमत कमी न होता ती वाढतच जाते. सैराटसुद्धा असाच एक चित्रपट आहे. हा चित्रपट सिनेगृहात होता त्याही वेळी तो पुन्हा पुन्हा बघणा-यांची संख्या खूप मोठी होती. अनेकांनी तर याबद्दलचे विक्रमही रचले. लोकांचं प्रेम आणि लोकाश्रय प्राप्त झालेली एखादी कलाकृती कशी लोकप्रिय होते याचं सैराट हे उत्तम उदाहरण.
आकाश ठोसर, रिंकु राजगुरु, छाया कदम, अरबाझ शेख, तानाजी गलगुंडे, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाने सजलेला, अजय-अतुल यांच्या झिंगाट गाण्यांनी सर्वांना वेडं करणारा आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाची जादू पसरवणारा सैराट या चित्रपटाचा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर बघायला विसरू नका येत्या २ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. फक्त झी मराठीवर.
‘सैराट’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
लोकाश्रय प्राप्त झालेली एखादी कलाकृती कशी लोकप्रिय होते याचं सैराट हे उत्तम उदाहरण.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 25-09-2016 at 15:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat movies world television premiere