नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने अकलूजच्या रिंकु राजगुरु या शाळकरी मुलीला प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलं. त्यानंतर दहावी इयत्तेत असलेल्या रिंकूने शाळेला रामराम ठोकल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण रिंकू तिचे चित्रपटसृष्टीतील करियर सांभाळत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेल असे तिच्या कुटुंबाने म्हटले आहे.
रिंकूचे आई-वडिल दोघही शिक्षक आहेत. याविषयी बोलताना रिंकूचे वडिल महादेव म्हणाले की, तिची आई आणि मी आम्ही दोघंही शिक्षक आहोत. अकलूज येथील स्थानिक शाळेत आम्ही मुलांना शिकवतो. असे असताना शिक्षकांची मुलगीच शिकणार नाही असे कसे होईल? असा सवालही त्यांनी केला. रिंकूने शिक्षणाला रामराम ठोकत तिचे शैक्षणिक करियर संपवल्याच्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही. रिंकूने दहावीचा १७ नंबरचा फॉर्म भरला आहे. याचा अर्थ ती बाहेरून दहावीची परिक्षा देऊ शकते. मग ती परिक्षा देत नसल्याचा प्रश्न येतोच कुठून? असा सवाल महादेव राजगुरु यांनी केला. सोलापूरातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेत रिंकू शिक्षण घेत होती. काही मुलाखतींमध्ये रिंकूने आपल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. हो, तिला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. पण, ती जेव्हा १२वीची परिक्षा देईल तेव्हाच आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ. सध्या तरी याबाबत आम्ही कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण एक गोष्ट नक्की की रिंकू तिचे शिक्षण पूर्ण करून सर्वांसमोर एक चांगला आदर्श ठेवेल, असेही ते म्हणाले.
सध्या रिंकू अभ्यासात व्यस्त असल्याचे तिच्या कुटुंबाने सांगितले. अकलूजमध्ये आल्यावर रिंकू जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देते. पुण्यातही ती तेच करतेय. तिच्यासाठी शिकवणी शिक्षकाची सोय करण्यात आली असून ते अकलूज येथील शिक्षक कॉलनीत तिची शिकवणी घेतात. त्याचप्रमाणे पुण्यातही तिच्यासाठी शिकवणीची सोय करण्याती आलीय, असे रिंकूचे वडिल म्हणाले. रिंकू अकलूजपेक्षा आता जास्तीत वेळ सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कुटुंबासमवेत पुण्यात राहत आहे. ती फार कमी वेळा अकलूजला येते. शाळेतून दाखला काढून घेण्यापूर्वी तिने केवळ दोन दिवस शाळेला हजेरी लावली होती.
रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनीही सैराटवर टीका केली होती. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा नसल्याचे रिंकूच्या वडिलांनी सांगितले. मराठा समाजाच्या आक्रोशाला सैराट चित्रपट जबाबदार असल्याचे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले होते. तसेच, तरुण मंडळी या चित्रपटातून चुकीच्या गोष्टीही शिकत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा