‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का…’ असं म्हणणाऱ्या आर्चीने आणि तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या परश्याने साऱ्या महाराष्ट्राला किंबहुना सर्व चित्रपट रसिकांना वेड लावलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आलेल्या या जोडीने आपली छाप सोडण्यात कमालीचे यश मिळवले. ‘सैराट’ची कथा, ती साकारण्यासाठी पडद्यावर दाखवण्यात आलेले कलाकार, त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री, नागराजच दिग्दर्शन यांमध्ये आणखी एका गोष्टीवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या, ते म्हणजे या चित्रपटाचे छायांकन अर्थात सिनेमॅटोग्राफी.
जातियवाद आणि समाजामध्ये असणाऱ्या विविध चालीरितींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामधील बऱ्याच दृश्यांतली शांतताच सारं काही सांगून जात होती. चित्रपटातील त्या शांततेलाही एक प्रकारचा आवाज होता, त्या शांततेतही विविध भाव होते आणि ते टिपण्याची किमया केली होती सुधाकर रेड्डी याकांती या जादूगाराने. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या विक्रमी चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी सांभाळत सुधाकर रेड्डी याकांती यांने चित्रपटाचा अचूक भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.
तेलगु चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेलं रेड्डीं हे नाव तसं मराठीतही बऱ्यापैकी रुळल आहे. ‘देऊळ’, ‘हायवे- एक सेल्फी आरपार’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांमध्ये सुधाकरने छायांकनाची जादू दाखवून दिली आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग ‘सैराट’च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाइन तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. छायांकनाच्या या क्षेत्रातील सुरुवातीच्या दिवसांविषयी सुधाकर म्हणाला होता, ‘माझ्या बालपणापासूनच चित्रपटांविषयी माझ्या मनात कुतूहल होते. शाळेच्या दिवसांपासूनच मला चित्रपटांच्या या दुनियेत प्रवेश करायचा होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करायचं होतं.’
छायांकनाच्या सैराट अनुभवाविषयी सुधाकर म्हणाला होता की, ‘हा निखळ प्रेमात बुडालेल्या दोन सुरेख पात्रांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुळ विषय जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मला कथानकाच्या दृष्टीने कॅमेऱ्याचे अँगल ठरवण्यासाठी फार मदत झाली. सैराटमध्ये प्रकाशयोजना, कॅमेऱ्याचं पोझिशनिंग आणि लेन्सिंग फार महत्त्वाचं होतं.’
‘सैराट’ चित्रपटाविषयी सुधाकरला काही खास गोष्टी समजावण्यात आल्या होत्या. आर्ची आणि परश्या, त्यांच्या प्रेमाच्या बळावर सजलेलं जग या साऱ्या गोष्टींबद्दलची माहिती नागराजने सुधाकरला दिली होती. नागराजने केलेल्या वर्णनानुसार त्याने आर्ची-परश्याचं एक विश्व उभं केलं.
#SairatMania : …म्हणून ‘सैराट’ आवडला नाही
सैराट प्रवासात नागराजची छबी टिपायलाही हा जादूगार विसरला नाही. नागराज हा खूप चांगला कथाकार आहे. त्याच्या कथा सांगण्याच्या पद्धतीमुळे मला छायांकनामध्ये फारच मदत झाली, असे सुधाकर मानतो. त्याचे हे शब्द सैराट आणि नागराज त्याच्या नेहमीच स्मरणात राहतील याचा पुरावाच आहे असे म्हणावे लागेल. या आणि अशाच काही सैराटलेल्या आठवणींसाठी वाचत राहा सैराट मेनिया (#SairatMania)