‘अलगूज वाजं नभात… भलतच झालंया आज…’ या ओळी कानावर पडल्यावर बऱ्याचजणांचा ‘सैराट’ झालं जी…’ असा कोरस तयारच असतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा पायंडा पाडलेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. जातीव्यवस्था, प्रेम आणि त्यामुळे समोर येणारी परिस्थिती यावर भाष्य करणारं कथानक हाताळत नागराज मंजुळेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. मुख्य म्हणजे ‘सैराट’च्या निमित्तानं आर्ची आणि परश्या या दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. एका सर्वसामान्य खेडेगावातून आलेले रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना ‘सैराट’ने बरंच काही दिलं. अशा या बरंच काही देणाऱ्या चित्रपटाची कृपादृष्टी काही गावांवरही झाली असं म्हणायला हरकत नाही. एरवी गाव म्हटलं की नाकं मुरडणारी मंडळीसुद्धा ‘सैराट’मुळे या खेड्यांकडे वळली.

अतिशय सरळ साधं कथानक असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण झालेली ठिकाणं आता पर्यटनस्थळं म्हणून नावारुपास आली आहेत. ‘सैराट’च्या वर्षपूर्तीनिमित्त अशा या ‘सैराट’ गावांचा आढावा आणि त्यासंबधीची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता ऑनलाइन’ तुमच्यासाठी घेऊन आलं आहे….

या ‘सैराट’ गावांविषयी तेथीलच काही व्यक्तींसोबत संवाद साधला असता या चित्रपटाने आम्हाला बरंच काही दिलं असं मत त्यांनी मांडलं. आर्ची-परश्याचं प्रेम महाराष्ट्रातील करमाळा तालुक्यातील कंदर, चिखलठणा, वांगी, देवळाली, करमाळा शहर या गावांमध्ये बहरलं आणि याच गावातील काही ठिकाणांवर ‘सैराट’ साकारला. खेडेगावांमध्ये चित्रीकरण झाल्यामुळे चित्रीकरणाची ती सर्व प्रक्रिया पाहण्यासाठी बघ्यांची अलोट गर्दी तेथे पाहायला मिळाली होती.
आर्ची-परश्या बसलेल्या झाडाची फांदी, ती विहीर, पावसाच्या सरीमध्ये भिजणारे आर्ची-परश्या आणि अशा बऱ्याच दृश्यांमध्ये या चित्रपटात गावातील काही ठिकाणांचा सुरेख वापर केल्याचं लक्षात येतंय. काही महिन्यांपूर्वीच ‘सैराट’मधील त्या झाडाची फांदी तुटल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. तसं पाहायला गेलं तर ते फक्त एक सुकलेलं झाड होतं. पण त्या सुकलेल्या झाडाचं सौंदर्यच जणू या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांसमोर आलं होतं… तेच हे झाड…

sairat-tree

sairat-tree1

ते म्हणतात ना खरं वैभव तर खेड्यांमध्येच असतं ते अगदी खरंय. खेड्यांचं हेच वैभव ‘सैराट’ने पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांना पटवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. ‘सैराट’चे चित्रीकरण याच गावात झाल्याचं जेव्हा लोकांना कळलं तेव्हा त्यांनी थेट या गावाला भेट देण्याचं ठरवलं. ‘आता गावात कोणाचं लग्न असो किंवा मग कोणाकडे पाहुणे आलेले असोत, ‘सैराट’ विहीर, ‘सैराट’ झाड आणि एकंदर संपूर्ण गाव पाहिल्याशिवाय कोणीच गावाला रामराम ठोकत नाही’, असं स्थानिकाने सांगितलं. ‘सैराट’मध्ये पावसाच्या सरीत आर्ची आणि परश्या ज्या पायऱ्यांवर उभे दिसतात तो हाच भाग. या गावातील देवीच्या पुरातन मंदिराच्या समोरच हा भाग आहे. सध्या या भागात पर्यटकांच येणंजाणं वाढलं आहे. विदेशी पर्यटकांनीही या ठिकाणांना भेट देण्यास सुरुवात केली आहे.

steps-1

steps

‘सैराट’मधील आणखी एक महत्त्वाचं ठिकाण जे आता एखाद्या पर्यटन क्षेत्रापेक्षा कमी नाही ते म्हणजे आर्चीचा बंगला. मुळात हा दगडी बंगला २२ वर्ष जुना आहे. खानदानी आर्ची, तिच्या वडिलांची असणारी इभ्रत या साऱ्याच्या अनुषंगाने खुद्द नागराजने या बंगल्याची निवड केली होती. चित्रीकरणाच्या दिवसापासून ते आजतागायत या बंगल्याला लाखो लोकांनी भेट दिल्याचं बंगल्याचे मालक भास्कर शंकरराव बांगे यांनी सांगितलं. ‘ज्योतिर्लिंग निवास’ या बंगल्याचं नाव बदलत चित्रपटामध्ये ‘अर्चना’ या नावाने हा बंगला सर्वांसमोर आला काय आणि सहलीचं ठिकाण झाला काय… गेल्या बऱ्याच दिवसांपासून आर्चीचा हा बंगला पाहण्यासाठी शाळांच्या सहली येत आहेत.

bangla-1

आर्ची आणि परश्याच्या या प्रेमकहाणीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणारं आणखी एक ठिकाण म्हणजे, ती भलीमोठी विहीर. गाव म्हटलं की विहीर आठवल्यावाचून राहात नाही. त्यातही ‘सैराट’मधील विहीर विशेष आकर्षणाचा विषय ठरली. आर्ची आणि परश्याची नजरानजर झालेली ती विहीर देवळाली गावातील राखुंडे यांच्या मालकीची असून ती बांधण्यासाठी ११ हजार ६५ रुपये इतका खर्च आला होता.

vihir

‘सैराट’च्या चित्रीकरणानंतर आणि चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटातील कलाकार या गावाला विसरतील असं जर कोणाला वाटत असेल तर… तुमचा अंदाज चुकतोय. या चित्रपटातील कलाकारांचेही करमाळ्याशी आणि चित्रीकरण झालेल्या बहुतांश ठिकाणांशी एक वेगळ्या प्रकारचे नाते जोडले गेले आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी ‘आता आमची जबाबदरी संपली… तुमची जबाबदारी सुरु’ असं म्हणत ‘आण्णा’ म्हणजेच नागराजने या गावाच्या प्रसिद्धीकडे अनेकांचं लक्ष वेधलं.

akash

‘सैराट’चं चित्रीकरण झालेली गावं आधी अनेकांना माहितही नव्हती. पण, ‘सैराट’ने आता त्यांना जगाच्या नकाशावर ओळख मिळवून दिल्याची भावना स्थानिकांच्या मनात आहे. उजनी धरणाशेजारील दृश्य, आर्ची-परश्या उभे असलेला तो दगडी वाडा हे सारं वैभव प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आलं. कोगावचा इनामदारांचा वाडा हे त्यापैकीच एक ठिकाण. जवळपास ४०० वर्षांपूर्वीचं या वाड्याचं बांधकाम पाहता तुम्हीही एकदा त्या ठिकाणी जाऊन इतिहासाचा अनुभव घेऊ शकता. त्यासोबतच कमला भवानी मंदिर, ९६ पायऱ्यांची विहीर, पुरातन सातविहीर ही चित्रीकरणातील आणखी काही पाहण्याजोगी ठिकाणं. एकंदरच काय तर, ‘सैराट’ने फक्त नवोदित कलाकारांनाच नावारुपास आणण्याचं काम केलं नाही, तर या गावांनाही एक नवी ओळख मिळवून दिली… ओळख गावच्या अस्तित्वाची.. ओळख गावकऱ्यांची..ओळख आपुलकीची आणि ओळख ‘सैराट’ गावांची.

वाचा : #SairatMania : ‘प्रिन्स’ला शिव्या पडतात तेव्हा….

vada

वाचा : #SairatMania : आर्ची-परश्याला ‘फ्रेम’ करणारा जादूगार

Story img Loader