अनेक कलाकारांना एकत्र घेऊन ‘मल्टिस्टारर’ चित्रपट काढणे ही दिग्दर्शक साजिद खानची खासियत आहे. ‘हाऊसफुल्ल’च्या यशस्वी चित्रपटांनंतर ‘हिम्मतवाला’मध्येही अजय-तमन्ना या मुख्य जोडीबरोबर अनेक नावाजलेले कलाकार चमकणार आहेतच पण, या चित्रपटाच्या निमित्ताने फिल्मी पाश्र्वभूमी असलेल्या तरुण सहाय्यक दिग्दर्शकांची चौकडीही साजिदबरोबर एकत्र आली आहे.
‘हिम्मतवाला’ चित्रपटात साजिदचा पहिला सहाय्यक दिग्दर्शक आहे तो सीमाब खान. अभिनेते अमजद खान यांचा हा मुलगा. अमजद खान यांनी १९८३ च्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटात शेरसिंग बंदूकवाला या खलनायकाची भूमिका रंगवली होती. त्यामुळे सीमाबचे या रिमेकशी वेगळेच भावनिक नातेही आहे. निर्माता-वितरक दिलसा धनवानी यांचा मुलगा अमित धनवानी, अभिनेत्री बीना बॅनर्जी यांचा मुलगा आणि अभिनेते प्रदीप कुमार यांचा नातू सिध्दार्थ बॅनर्जी यांच्याबरोबर ‘वीर’, ‘अजनबी’, ‘हलचल’ सारख्या चित्रपटांचे निर्माते विजय गालानी यांचा मुलगा प्रतीक हाही या चौकडीत आहे.
या चौघांना एकत्र आणण्यामागे साजिदचा काही उद्देश होता का, या प्रश्नावर हा निव्वळ योगायोग असल्याचे त्याने स्पष्ट केले. यातल्या दोघांनी माझ्याबरोबर ‘हाऊसफुल्ल २’ चेही काम केले होते. चित्रपट दिग्दर्शनाबद्दल त्यांच्यापैकी प्रत्येकाचे स्वतंत्र विचार, कल्पना आहेत. त्यामुळे निर्मितीच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मी सहभागी करून घेतो. मी स्वत: कोणतीही चौकट मानत नसल्यामुळे मोठय़ा भावासारखे त्यांना समजून घेत काम करायला मजा येते, असे साजिदने स्पष्ट केले.

Story img Loader