‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सर्वांच्या भेटीला आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi). या मालिकेमध्ये दोघे एकत्र दिसले होते आणि ही जोडी प्रेक्षकांना आवडलीदेखील होती. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटकही त्यांनी केलं. त्यानंतर हे दोघे ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सखी-सुव्रत यांच्या या नाटकाला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
सखी गोखलेची ‘वरवरचे वधूवर’च्या नाटकाबद्दलची सोशल मीडिया पोस्ट
‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकाला यंदाच्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये बक्षीसरूपी कौतुकाची थाप मिळत आहे. सर्वत्र या नाटकाचे कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्री सखीनं (Sakhi Gokhale) या नाटकाबद्दलची एक खास पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या या पोस्टमध्ये तिने नाटकाबद्दल आणि सहकलाकारांबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले आहेत. तसंच तिने या नाटकातील संधीबद्दलही आभार मानले आहेत.
“विनोदी नाटकातील भूमिकेसाठी नामांकन मिळणे ही विशेष गोष्ट”
सखीने (Sakhi Gokhale) तिच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे, “मला ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhuvar Play) या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या श्रेणीत नामांकन मिळाले. मी जिंकली नाही; पण प्रामुख्याने विनोदी नाटकातील भूमिकेसाठी मुख्य श्रेणीत नामांकन मिळणे ही माझ्यासाठी विशेष गोष्ट होती. मी लहानपणी पाहिलेल्या विनोदी सादरीकरण/नाटकांमध्ये नेहमीच एक विशिष्ट पद्धत असायची. यात स्त्री पात्रे दृश्य मांडणी करत असत आणि पुरुष पात्रे विनोद घडवत असत. विनोद निर्माण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असायची. महिला बहुतेकदा विनोदांचा केंद्रबिंदू असायची”.
“स्वतःला भाग्यवान समजते की, विनोदी सादरीकरणाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मिळाली”
यापुढे तिने म्हटलं, “स्त्रीची वैशिष्ट्ये, तिचे शरीर, तिचे गुण इत्यादींवर आधारित विनोद असायचे. पण आता विराजस कुलकर्णीसारखे माझे समकालीन कलाकार त्या रूढीवादी कल्पनांना तोडत आहेत. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला विनोदी सादरीकरणाचे नेतृत्व करण्याची समान जबाबदारी मिळाली. ‘नायिके’चे सर्व गुण असलेले पात्र लिहिण्यासाठी, तिला थोडे अधिक विनोद देण्यासाठी आणि नाटकाचे कथन तिच्याभोवती रचण्यासाठी धाडस लागते आणि विराजसने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते”.
सखीने मानले नवरा सुव्रत जोशी, आई शुभांगी गोखले आणि नाटकाच्या टीमचे आभार
पुढे सखीने (Sakhi Gokhale) लिहिलं आहे, “मी माझ्या संपूर्ण टीमचे, माझ्या सह-निर्मात्यांचेही आभार मानू इच्छिते की, त्यांनी माझ्या क्षमतेवर कधीही शंका घेतली नाही. माझ्या आईनेही माझा अभिनय पाहिला आणि अभिमानाने आनंद व्यक्त केला. शेवटी मी माझा सह-अभिनेता, सह-निर्माता व सह-प्रवासी सुव्रत जोशीचे (Suvrat Joshi) आभार मानते. तुझा माझ्यावरील विश्वास ही एक प्रेरक शक्ती आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”.