सक्षम कुलकर्णी सध्या ‘झी युवा’ वाहिनीवरच्या ‘लव्ह, लग्न लोच्या’ नावाच्या मालिकेतून सातत्याने प्रेक्षकांसमोर आहे. ‘घंटा’मध्ये त्याने उमेश ही व्यक्तिरेखा साकारली आहे. टेक्नोसॅव्ही आणि आजच्या तरुणाईप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक ते तंत्रज्ञानाच्या आभासी जगात रमलेल्या उमेशला स्वत:ची सोशल साइट सुरू करायची आहे आणि त्यासाठी त्याला पैसे हवे आहेत. राज (अमेय वाघ) आणि अंगद (आरोह वेलणकर) या दोन मित्रांच्या साथीने पैसे मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. मात्र इथेही साहसी मार्गानेच पैसे मिळवण्याची करामत करताना ते तिघेही सतत अडचणीत सापडतात, अशी कथा आहे. या चित्रपटाचा जॉनरच वेगळा असल्याने ही भूमिका लगेचच स्वीकारल्याचे सक्षमने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘घंटा’मध्ये या तिन्ही व्यक्तिरेखा आणि त्यांच्याबरोबरच्या घडामोडी दाखवण्यासाठी अ‍ॅनिमेशनचाही खुबीने वापर करून घेतला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक शैलेश काळे याने कथा ऐकवली तेव्हाच त्याच्यातला वेगळेपणा जाणवला. शिवाय, या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, किशोर कदम आणि मुरली शर्मा यांच्यासारखे कसलेले कलाकारही असल्याने काम करतानाही मजा आल्याचे त्याने सांगितले. चित्रपटात उमेश, राज आणि अंगद यांच्यातली मैत्री हा मध्यवर्ती भाग आहे. त्यासाठी चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच मी, आरोह आणि अमेय आम्ही तिघांनीही एकत्र येऊन कित्येक वेळा पटकथेचं वाचन केलं. यानिमित्ताने आमची रोजच भेट होत होती आणि त्यातून आपसूकच मैत्रीचं नातं तयार झालं. त्यामुळे काम करताना आम्ही एकमेकांना कुठे, कधी, कशा प्रकारे व्यक्त होणार याचीही व्यवस्थित कल्पना आली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम पडद्यावर दिसतो, असे सक्षमने सांगितले. ‘घंटा’ हा तरुणांचा चित्रपट आहे हे सांगताना ‘सैराट’चा उल्लेख त्याने आवर्जून केला. ‘सैराट’मध्ये या पिढीची कथा आहे, त्यामुळे साहजिकच तरुण वर्ग या चित्रपटाशी मोठय़ा प्रमाणावर जोडला गेला. अशा प्रकारे तरुणांना जोडणारा आशय जर चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून वरचेवर निर्माण होत राहिला तर त्याचा मराठी चित्रपटांच्या विकासाला हातभार लागेल, असे मत त्याने व्यक्त केले. ‘घंटा’ हा एकदम हलकाफुलका मनोरंजनात्मक चित्रपट असला तरी आजच्या तरुणांसाठी त्यात संदेशही आहे. कधीही आशा सोडू नका. स्वप्नपूर्तीसाठी आशेने, चिकाटीने प्रयत्न करत राहिले पाहिजे. यशच प्रत्येक वेळेला हुलकावणी देईल, पण तुम्ही प्रयत्नच सोडलेत तर ‘घंटा’ काही हाती लागणार नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे सक्षमने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saksham kulkarni role in marathi movie ghanta