सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक व दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच त्यांना त्यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यामुळे सलील कुलकर्णी चर्चेत आले. संपूर्ण सिनेसृष्टीने त्यांचं कौतुक केलं. चित्रपट, मालिका, लाईव्ह शोज तसेच रीयालिटि शोजचे परीक्षक म्हणून वेगवेगळ्या माध्यमांमधून ते आपल्यासमोर आले आहेत. संदीप खरे यांच्याबरोबरचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली.
नुकतंच सलील कुलकर्णी यांनी पत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी सलील यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. राष्ट्रीय पुरस्कार घेताना काय भावना होता, तसेच लहान मुलांचं भावविश्व यासंदर्भातही त्यांनी बरीच चर्चा केली. या मुलाखतीदरम्यान सलील यांनी त्यांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं. २०१३ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन दोन मुलांना सांभाळायचं ठरवलं त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्यावर झालेली टीका याबद्दल खुलासे केले आहेत.
आणखी वाचा : Gadkari Review: अत्यंत उथळ, सुमार अन् भरकटलेला चित्रपट
याबद्दल बोलताना सलील म्हणाले, “जेव्हा मी वेगळं झालो त्यावेळी माझ्याबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्या दोन मुलांना एकटा बाप वाढवणार आहे हे समजून घेण्याइतका समजूतदारपणा लोकांमध्ये का नसतो? मी अजिबात या गोष्टीचा त्रागा करत नाहीये, पण त्याकाळात बड्याबड्या गायक गायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना याविषयी गॉसिप करताना पाहिलं आहे. कित्येकांनी तर मला तोंडावर येऊन विचारलं आहे की मी अमुक अमुक मुलीशी लग्न केलं आहे का?”
पुढे ते म्हणाले, “ही वृत्ती फार वाईट आहे, रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीच्या हातून महागडं घडयाळ चोरायचीच ही वृत्ती आहे. अशा अडचणीत सापडलेल्या माणसाला जर तुम्ही मदत करत नसाल तर किमान त्याला त्याचा लढा लढू द्यावा. लोक अशाप्रकारचं गॉसिप एंजॉय करतात. लांबून खडे मारायचं काम कशाला करायचं? संदीप खरेनी माझ्याबाबतीत एक जाहीर पोस्ट करत सांगितलं होतं की तुम्ही त्याला कृपया त्रास देऊ नका, तो त्यांच्या मुलांचं प्रेमाने करतोय, अन् त्याने जर लग्न केलं तर तो तुम्हाला कळवेल. कित्येकदा हॉटेलमध्ये गेल्यावर हे गॉसिप माझ्या कानावर पडायचं.”
सामान्य लोकच नव्हे तर बऱ्याच सेलिब्रिटीजनीसुद्धा सलील यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल थेट प्रश्न विचारल्याचंही त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. त्या काळात सलील यांना त्यांच्या आईचाही चांगला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१३ च्या या घटनेनंतर सलील यांच्या आयुष्यात बरेच बदल घडल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.