बॉलिवूडच्या गल्लापेटीवर सर्वाधिक विक्रमी गल्ला गोळा करणारा नायक म्हणजे अभिनेता सलमान खान हे त्याच्या लागोपाठ तीन-चार चित्रपटांनी दाखवून दिले आहे. ‘बिग बॉस’मध्ये सूत्रसंचालक म्हणूनही सलमानने चांगले यश मिळवले. अर्थात सलमानच्या छोटय़ा पडद्यावर येण्याने या रिअ‍ॅलिटी शोच्या निर्मात्यांना अधिक फायदा झाला. आता बिग बॉसच्या आगामी पर्वामध्येही सलमान खान सहभागी होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. त्याला अडीच कोटी रुपयांऐवजी तीन कोटी रुपये मानधन हवे आहे यावरून ही चर्चा होत होती. परंतु, कार्यक्रमाची लोकप्रियता एकटय़ा सलमान खानमुळे टिकून राहते हेही निर्मात्यांना चांगलेच ठाऊक असल्यामुळे अखेर हा वाद संपुष्टात आला असून सलमानला मानधन वाढवून देण्यात आल्याचे समजते.
‘बिग बॉस’च्या निर्मिती संस्थेने मानधन वाढवून देण्याऐवजी दुसरा बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानला पाचारण करण्याची तयारी केली होती. निर्मिती संस्थेतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सलमान खानचा तीन पर्वासाठी एकत्रितपणे करण्यात आलेला करार गेल्या पर्वानंतर संपला. त्यामुळे वाहिनीने सलमान सोबत शाहरूख खानशी बोलणी केली होती. कारण सलमान नाही म्हणाला तर शाहरूख खानशी आधी बोलणी करणे क्रमप्राप्त ठरते हे ओळखून वाहिनीने आगामी पर्वासाठी शाहरूखसोबत करार करण्याचा विचार केला होता.
सध्या सोहेल खानच्या निर्मितीखालील चित्रपटाच्या चित्रीकरणात सलमान व्यस्त आहे. त्यानंतर दुसरा चित्रपट करण्यापूर्वी तो बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी पर्वाचे चित्रीकरण करणार आहे. यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर रिअ‍ॅलिटी शोच्या निर्मिती संस्थेतील एकाने सांगितले की, सलमान आणि शोचे निर्माते यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर तीन पर्वामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांशी असलेला त्याचा संबंध आता प्रस्थापित झाला आहे. त्यामुळेच वाहिनीने त्याच्याशी पुन्हा करार करून मानधनातही वाढ देण्याचे ठरविल्याचे समजते.

Story img Loader