एखादा कलाकार कधी प्रसार माध्यमावर बहिष्कार घालतो, तर कधी प्रसार माध्यमेच एखाद्या कलाकाराच्या वाटेला जात नाहीत. सलमान खानबाबत असे अधून-मधून घडत असते. छायाचित्रकारानी त्याच्यावर बहिष्कार घातला हा वाद ताजा असून, त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातदेखील असा वाद झाला होता. ‘मैने प्यार किया’च्या नटराज स्टुडिओतील चित्रीकरणाच्या वेळी शूटिंगचा आँखो देखा हाल पाहायला आम्हा सिनेपत्रकारांना बोलावले असता, त्या दोन दिवसात सल्लूने सेटवरच येण्याचे टाळले. ‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’ असे काही चित्रपट प्रदर्शित होत जाताना तर सल्लूच्या वागण्यात अधिकच फरक पडला. तो प्रसार माध्यामाशी तुसडेपणाने वागू लागला. ‘सनम बेवफा’च्या सेठ स्टुडिओतील मुहूर्तप्रसंगी या साऱ्याचा कहर झाला. मुहूर्त दृश्य होताच काही छायाचित्रकारांनी निर्माता-दिग्दर्शक सावन कुमारला सलमान खानचे फोटो काढण्यास नकार दिला. एकट्या रुखसारचे फोटो काढच्या तयारी त्यांनी दर्शविली, सल्लूसाठी हा मोठा धक्काच होता. हे प्रकरण त्या वेळी बरेच गाजले. दरम्यान, रुखसारऐवजी चांदनीची नायिका म्हणून निवड झाली. सल्लूमध्ये सुधारणा होण्यात बराच काळ जावा लागला. त्याचे काही चित्रपट गल्ला पेटीवर यशस्वी ठरल्याने त्याचे प्रसिध्दीबाबत फारसे नुकसान झाले नाही इतकेच. एकूण काय, तर सल्लू विरुध्द प्रसार माध्यमे हा सामना तसा नवा नाही.

Story img Loader