अभिनेता सलमान खान आणि त्याची कथित प्रेयसी लुलिया वेंतुर या दोघांनी अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला एकत्र हजेरी लावल्याने या दोघांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सुरूवातीला मर्सिडीज गाडीतून सलमान खान कार्यक्रमस्थळी आला. त्यापाठोपाठ लुलिया वेंतुरही तिच्या ऑडी गाडीतून याठिकाणी आली. सलमानने गाडीतून उतरल्यानंतर प्रथम क्रिकेटपटू युवराज सिंगची गळाभेट घेतली. यादरम्यान लुलियादेखील तिच्या कारमधून बाहेर आली. तेव्हा सलमानने लुलियाची युवराज सिंगबरोबर ओळख करून दिली आणि त्यानंतर दोघेजणही आतमध्ये गेले. याठिकाणी सलमान आणि लुलियाने साधारण दोन तास एकत्र वेळ घालवला. स्वागत समारंभातून घरी जाण्यासाठी निघतानाही पत्रकारांनी लुलियाला सलमानसोबत लग्न करणार असल्याबद्दल प्रश्न विचारले. मात्र, तेव्हा लुलियाने शांत राहणेच पसंत केले. यानंतर काही वेळातच सलमान खानदेखील सगळ्यांची भेट घेऊन घरी निघाला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सलमान खानने शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेकांना लुलियाची ओळख करून देताना ती आपली जवळची मैत्रीण असल्याचे सांगितले. त्यामुळे सलमान आणि लुलिया यांच्यात पुढे काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
अखेर, यावर्षी सलमान बोहल्यावर चढणार? 
काही दिवसांपूर्वी पंजाबमधले ‘सुल्तान’चे चित्रीकरण आटपून सलमान आणि त्याची आई सलमा खान मुंबईत परतताना लुलिया त्यांच्याबरोबर होती. लुलिया सलमानच्या आईची यावेळी काळजी घेताना दिसून आली.

Story img Loader